पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त अन् पुरग्रस्त भागातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी आत्मियतेने प्रयत्न सुरू : पालकमंत्री अदिती तटकरे
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील कामथी नदीलगतच्या गावात पुलांचे अप्रोच रस्ते वाहून गेले, साखर सुतारवाडी व केवनाळे या ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू व १४ जण जखमी झाले आहेत. अन्य ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बाधित झाल्याने दळणवळण बंद झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानाच्या ९ लाखांपैकी ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला असून जखमींवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना १५ हजारांचे अनुदान जमा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी आत्मियतेने प्रयत्न करत आहोत, अशी ग्वाही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील आडावळे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील चिखली येथील पुल, मोरसडे येथील आडाचा कोंड व गवळ्याचा कोंड येथील पुल, चांदले येथील पुल, कामथे येथील दरडग्रस्त भाग तसेच अन्य दरडग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ना.अदिती तटकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीसोबत केलेल्या वार्तालापावेळी ही माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या सोबत पोलादपूर आपत्ती निवारणकामी प्रतिनियुक्तीवर असलेले पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, राष्ट्रवादी सेवादलाचे वाय.सी. जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण खेडेकर महाराज, जिल्हा सरचिटणीस सुहास मोरे, शहर अध्यक्ष अजित खेडेकर, मोरसडेचे सरपंच भिवाशेठ उतेकर, आडावळेच्या विद्यमान सरपंच सारिका रमेश घाडगे आणि माजी सरपंच रेणुका उतेकर, अनिलकुमार भोसले, गटविकास अधिकारी जगताप, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सणस, बारकू शिंदे, मनोहर पार्टे, चंद्रकांत उतेकर तसेच विविध बाधित परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment