आली आंबिवली येथील तरुणांचे मोठे योगदान
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाड आणि आजूबाजूच्या परीसरातील जनता पुराच्या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांचा धीर खचलेला आहे, हतबल झालेली आहेत.पण डोळ्यातील चमक मात्र तशीच आहे, ही त्याचीच ग्वाही आहे की मी पुन्हा भरारी घेईन.पुराच्या पाण्याने सर्वकाही हिरावून घेतल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रसायनी पाताळगंगा परिसरातील शिवसैनिकांनी पूरग्रस्त ठिकाणी जाऊन मदतीचा हात दिला.यात आली आंबिवली येथील तरुणांनी नैतिक कर्तव्य समजून मदत केली.
महाड आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता, पाण्याने उच्चतम पातळी गाठून त्याच रौद्ररूप दाखवलं, पाणी ओसरल्यावर शिल्लक राहिला तो फक्त चिखल मातीचा गाळ, माणसं फक्त आपलं माणूस जागेवर आहे की नाही याचाच शोध घेत होती, घरातील आणि घराबाहेरील सामान, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक सामान केव्हाच वाहून गेले होते. मोबाईल फोन हे तर केव्हाच नाकाम झाले होते कारण लाईट केव्हाच गेली होती.

पण माणसातील माणूसपण आणि माणुसकी जागली आणि मदतीचा एकेक हात पुढे व्हायला लागला.महाड तालुक्यातील खेड्यातील नागरिकांना मदत व्हावी यासाठी आली आंबिवली येथील सत्तरपेक्षा जास्त तरुणांनी प्रत्येकी एक-दोन हजार पैसे काढून पूरग्रस्तांना मदत केली.त्यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवून हातभार लावला.
यातून परिसरातील शिवसैनिकांनी जिवनावश्यक वस्तूंचे किट, लहान मुले, महिलांकरिता कपडे,साड्या, पिण्याचे पाणी असे साहित्याने भरलेली टेम्पो वाहने महाड तालुक्यात नेऊन तेथील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.यावेली परिसरातील शिवसैनिकांनी साड्या, लहान मुलांचे कपडे,मोठ्यांचे कपडे,पिण्यासाठी पाणी, झोपताना अंगावर घेण्यासाठी ब्लॅंकेट, चादर,चटया,तसेच सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूं पूरग्रस्तांना वाटप केल्या.








Be First to Comment