Press "Enter" to skip to content

‘भारतीय संविधान’ ही भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी – डाॅ.भगवान लोखंडे

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगडच्यावतीने संविधानिक मूल्य प्रसारात तरुणाईची भूमिका या विषयावर नुकतेच एक विशेष व्याख्यान ऑनलाईन गुगल मीटवर व फेसबुक लाईव असे संपन्न झाले.

खरे राष्ट्रीयत्व, खरी देशभक्ती, फँसिस्ट राष्ट्रवाद, आयडिया ऑफ इंडिया तसेच सामाजिक सद्भाव काय आहे याची माहिती नागरिकांना व्हावी, राष्ट्र उभारणीसाठी इथला तरुण खऱ्या अर्थाने जाग्रूत झाला पाहिजे, संविधानाने त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवल्यात याची माहिती तरुणांना झाली तर ते संविधानिक मूल्य प्रसारात त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे देतील हे ओळखून या विषयाचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी राज्यशास्त्र व संविधानाचे गाढे अभ्यासक असलेले समितीचे वैज्ञानिक जाणिवा विभागाचे जिल्हा कार्यवाह प्रा. डॉ. भगवान लोखंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

प्रारंभी रायगड जिल्हा युवा सहभाग कार्यवाह प्रियांका खेडेकर यांनी संविधानावरील गाणं सादर करून सूत्रसंचालन केले. जिल्हा प्रधान सचिव संदीप गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व समितीची भूमिका मांडली. अलिबाग शाखेच्या कार्यकर्त्या श्रावणी मगर यांनी वक्ते डॉ. लोखंडे यांचा परिचय करुन दिला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष व रिटायर्ड अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड हे होते.

संविधानिक मूल्य प्रसारात तरुणाईची भूमिका या विषयाची मांडणी लोखंडे यांनी राष्ट्रीयत्व, संविधानिक मूल्य – न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, फँसिस्ट राष्ट्रवाद आणि तरुणाई अशा चार भागात केली. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहताना राष्ट्रीयत्वाचे शहारे येणे हे खरे राष्ट्रीयत्व नसून, संविधानाने दिलेले मूल्य विचार हे आपल्या जीवनाचे ध्येय व्हावे यासाठी कार्यरत राहणे हे खरे राष्ट्रीयत्व आहे. भारतीय संविधान ही स्वातंत्रोत्तर भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे, ती न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित आहे व प्रगल्भ, सम्रुद्ध भारतीय समाजाची उभारणी करण्याचे क्रांतिकारी संकल्प आहे. समतेच्या तत्वाने प्रस्थापित केलेली सामाजिक सार्वभौमत्वाची रूजवात ही एका जाती विशिष्ट सार्वभौमत्वाचा अंत आहे. म्हणूनच संविधानातील समतेचा अधिकार हा वैभवशाली राज्यक्रांती ठरतो असे ते म्हणाले.

पुढे तरुणाईला आणखी सजग करताना डॉ. लोखंडे असे म्हणाले कि धर्मनिरपेक्षता व समाजवाद हा संविधानाचा मूलभूत गाभा आहे, संविधान म्हणजे केवळ नियमांचे पुस्तक नव्हे तर तो एक क्रांतिकारी दस्त आहे. परंतु संविधानाविषयी भ्रम व गैरसमज पसरविण्याचे कामं येथील काही सत्ताधारी व कर्तव्यचुकार लोक सातत्याने करीत आहेत, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच फँसिस्ट राष्ट्रवाद तरुणाईस आकर्षित करण्यासाठी इतिहासाचे विक्रुतिकरण व स्थिर प्रतिभा या तत्वांचा अवलंब करीत आहे, यातुन तरुणाईने स्वतःला बाजूला करुन संविधानास अभिप्रेत आयडिया ऑफ इंडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी कटिबद्ध व्हावे, संविधानिक मूल्य प्रसारात निश्चित भूमिका घ्यावी व संविधान साक्षर ग्राम ही योजना कार्यान्वित व्हावी अशी आवाहने डॉ. लोखंडे यांनी शेवटी तरुणांना केली.

शेवटी आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष विनय कुमार सोनावणे यांनी केले. या कार्यक्रमाचे तांत्रिक काम पनवेल शाखेचे सिद्धेश गोसावी,वैभव व जिल्हा सोशल मीडिया कार्यवाह महेंद्र ओव्हाळ यांनी उत्तम रित्या सांभाळले. याप्रसंगी महा. अंनिसचे राज्य पदाधिकारी उपाध्यक्षा निर्मला फुलगावकर, राज्यपदाधिकारी नितीन राऊत, सुरेखा भापकर, डाॅ.ठकसेन गोराणे, जिल्हा पदाधिकारी, जिल्ह्यातील क्रियाशील व हितचिंतक सभासद यांसह फेसबुक वर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.