सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
गेले ४ ते ५ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती उरणमधील काही गावात निर्माण झाली आहे. तरी या आपत्कालीन जनतेला त्वरित शासकीय मदत मिळण्याची मागणी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने गेली २ वर्षे सर्वसामान्य जनतेच्या घडी विस्कटली आहे. त्यात पावसाने रुद्रवतार धारण करून राज्यातील व उरण तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या घरांना पावसाचे पाणी घुसून पूरग्रस्त परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी उरणमधील ज्या नागरिकांना याची झळ पोहचली असेल त्यांचे पंचनामे त्वरित करून शासकीय पातळीवरील आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू व कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांनी केली आहे. यावेळी आपण लवकरात लवकर आपत्कालीन जनतेला मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले.








Be First to Comment