Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांची एक्झीट

रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील एक पर्व संपले : संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रात हळहळ

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे येथील जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र नारायण सोष्टे (वय ६९) यांचे अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोरोनाने निधन झाले.

जिल्हा रुग्णालयात गेले १७ दिवस नवीनचंद्र सोष्टे यांनी कोरोनाशी जिकरीचे झुंझ दिली. परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. अखेर कोरोनाने त्यांचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नवीनचंद्र सोष्टे हे कोरोना संसर्गामुळे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयात दाखल झाल्याचे समजल्यानंतर लगेचच त्याच दिवशी कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर व्यक्तिशः लक्ष ठेवण्याच्या सुचना डाॅ. माने यांना दिल्या होत्या. त्यानंतरही आ. अनिकेतभाई तटकरे रोजच्या रोज त्यांच्या तब्बेतीची माहिती संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन घेत होते. त्यानंतरही अखेर कोरोनाने त्यांचा बळी घेतलाच.

जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांच्या निधनाने नागोठणेसह रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेतील मोठा आधार गेला असल्याची प्रतिक्रिया नागोठणेकर नागरिकांनी व्यक्त केली. नवीनचंद्र सोष्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नात, नातू, असा परिवार आहे.

नविनचंद्र सोष्टे यांनी वयाच्या १८ व्या वर्षांपासून पत्रकारिता सुरु केली. तेव्हापासून रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेत ते एक झपाटलेले व्यक्तिमत्व होते. पत्रकारिता करत असताना सर्वप्रथम सकाळ मध्ये ३० वर्षे नंतर सामना, सागर, कृषिवल, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, रायगड (रत्नागिरी) टाइम्स या वृत्तपत्रांध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले होते. या व्यतिरिक्त नागोठणे येथे त्यांची “शुभेच्छा प्रकाशन” नावाने प्रिंटिंग प्रेस व्यवसायही त्यांनी अनेक वर्षे केला होता. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदही त्यांनी सहा वर्षे भूषवले होते.

१९८२ मध्ये बिहारमधील जगन्नाथ मिश्रा सरकारने बिहार प्रेस नावाचे बील बहुमताच्या जोरावर पाच मिनिटात मंजूर केले. विधायकाच्या कोड मधील कलम २९२ आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड मधील कलम २५५ या बिलाचे कायद्यात रूपांतर केले. या कलमाद्वारे माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधात सर्वप्रथम मराठी पत्रकार परिषदेने या विधायकाच्या विरोधात लढा दिला .

पत्रकार परिषदेने थेट रस्त्यावर उतरून सोलापूर येथे तीव्र आंदोलन केले व बंदी हुकूम मोडून ८० जिगरबाज पत्रकारांना अटक झाली. यामध्ये नवीन सोष्टे यांचा समावेश होता. त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कसलीही तमा न बाळगता लढा दिला. दिवंगत नवीनचंद्रजी सोष्टे यांनी आय.पी.सी.एल. प्रकल्पग्रस्तांना आपल्या धारदार लेखणीतून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्नही त्याकाळी केला होता.

रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार, संवेदनशील मनाचे आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवीन सोष्टे यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक प्रश्न धसास लावले. ज्या काळात कोकणात पत्रकारिता विकसित झालेली नव्हती त्या काळात त्यांनी गरीब, वंचित उपेक्षितांचा आवाज बनून लोकांना न्याय मिळवून दिला. यातूनच विविध सामाजिक संघटनांशी ते जोडले गेले होते.

दिवंगत नवीनचंद्र सोष्टे यांनी आत्तापर्यंत “प्रितीला विफलतेचा शाप” या नाटकासह वैविध्यपूर्ण अशी २२ पुस्तके लिहिली. त्यामध्ये “आंबाकाठवरील अश्रू” या पुस्तकाला वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी कडून गौरविण्यात आले होते. हे पुस्तक यनिव्हर्सिटी मध्ये अभ्यासासाठीही ठेवण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. अशा या नागोठण्यातील सुपुत्राला कोरोनाने आयुष्याततून एक्झिट घ्यावयास लावल्याने नागोठण्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पत्रकारितेचे एक पर्व संपल्याची भावना संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेत एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.