साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक व शेतकऱ्यांचा मित्र आहे – सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांचे मत
आज नागपंचमी त्यानिमित्ताने धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जारीकोटचे मुख्याध्यापक तथा सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांची स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी घेतलेली मुलाखत
प्रश्न – पहिल्यांदा आपण एक प्राथमिक शिक्षक असून सर्पमित्र कसे झालात ? याची माहिती द्यावी
उत्तर – बालपणापासूनच साप व इतर वन्यप्राण्याबाबद्दल माझ्या मनात भीती तर होतीच व कुतुहुलपण होते. त्याच कुतूहलाचे नंतर जिज्ञासेत बदल झाला. योगायोगाने माझी भेट अतुल बागडे सरांशी झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्पमित्र झालो.
प्रश्न – जगात सापाच्या किती जाती आहेत ? भारतात त्यापैकी प्रामुख्याने किती साप आहेत ?
उत्तर – जगात तीन ते साडेतीन हजार सापांच्या जाती आहेत. त्यापैकी जवळपास 300 प्रकारचे साप भारतात आढळून येतात.
प्रश्न – सापाचे एकूण प्रकार किती आहेत ?
उत्तर – सापाचे एकूण तीन प्रकार पडतात, एक विषारी, दुसरे निमविषारी व तीसरे बिनविषारी
प्रश्न – साप सस्तन आहे का ?
उत्तर – साप हा सस्तन प्राणी नाही.
प्रश्न – साप हा अंडज आहे का जारज ?
उत्तर – काही साप अंडी घालतात तर काही साप थेट पिल्लांना जन्म देतात.
प्रश्न – सापांचा प्रजनन काळ कोणता असतो ?
उत्तर – प्रत्येक सापाचा प्रजनन काळ वेगवेगळा असतो. अमुक एका काळात प्रजनन करतात असे काही नाही.
प्रश्न – साप एकावेळी साधारण किती अंडी देतो ? तसेच किती पिलांना जन्म देतो ?
उत्तर – प्रत्येक सापांची अंडी देण्याची व पिल्ले देण्याची क्षमता वेगळी असते.
प्रश्न – प्रामुख्याने सापाचे निवासस्थान कोणते ?
उत्तर – प्रामुख्याने वारूळ हे सापाचे निवासस्थान समजले जाते परंतु त्याशिवाय उंदराचे बीळ, घराच्या आजूबाजूला असलेले विटा व दगडांचे ढीग, घराच्या भिंतीतील भेगा आणि अडगळीत असलेले साहित्य हे सापांचे निवासस्थान होऊ शकते.
प्रश्न – साप घराजवळ येऊ नये म्हणून काय करता येईल किंवा काय करावे ?
उत्तर – घरच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरात बेडूक, उंदीर, पाली व असे कोणतेही प्राणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. दगड विटांचा ढीग किंवा लाकडे घराच्या आसपास ठेवू नयेत. कारण साप नेहमी अश्याच अडगळीचा शोध घेऊन लपत असतो.
सापाविषयी समाजात काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे याविषयी माहिती द्यावी
प्रश्न – साप दूध पितो असा एक समज आहे तर खरंच दूध पितो का ?
उत्तर – दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. आणि साप हा सस्तन प्राणी नसल्याने तो दूध पित नाही. साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे.
प्रश्न – सापाला ऐकू येते का म्हणजे कान असतात का ?
उत्तर – सापाला कान नसतात त्यामुळे तो ऐकू शकत नाही.
प्रश्न – साप बदला घेतो असे अनेक चित्रपटात दाखविल्या जाते त्याविषयी आपले मत
उत्तर – बदला घेण्याइतपत सापाची बुद्धी विकसित झालेली नाही. त्यामुळे तो बदला घेऊ शकत नाही, चित्रपटात सर्व काही काल्पनिक दाखविले जाते.
प्रश्न – खजिना असेल त्याठिकाणी साप हमखास असतो असे काही लोकं म्हणतात, तुम्हांला काय वाटते
उत्तर – ही एक अंधश्रद्धा आहे. सापाला खजिना, सोने-नाणे या गोष्टी माहीत नसतात. पूर्वी अडगळीच्या खोलीत धान्य
किंवा किमती ऐवज ठेवायचे. त्याठिकाणी कुणीही जात नसल्याने उंदरांचा वावर होतो. त्यामुळे साप तेथे भक्ष्याच्या शोधात येतात.
प्रश्न – चित्रपटात सापाच्या अनेक कथा दाखविल्या जातात, ते काल्पनिक असतात, पण तुम्हांला तसे कुठे सत्य आढळून आले आहे का ?
उत्तर – चित्रपटातील सापांच्या कथा या काल्पनिक असतात. अजूनपर्यंत तरी वास्तविक जीवनात असे कधी काहीही आढळून आले नाही. सापाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यास त्याच्याविषयी मनात असलेली भीती कमी होईल..
प्रश्न – एकंदरीत आज नागपंचमी असल्याने आपण सर्व जनतेला एक सर्पमित्र म्हणून काय संदेश देऊ इच्छिता ?
उत्तर – साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा प्राणी व शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील उंदरावर नियंत्रण ठेवतो त्यामुळे भरघोस उत्पन्न वाढण्यास मदत होते. हिंदू धर्मात नाग या सापाला खूप महत्वाचे स्थान आहे. हे स्थान आपण वर्षभर त्याचे संरक्षण करून टिकवून ठेवावे ही विनंती. सर्वांना नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Be First to Comment