Press "Enter" to skip to content

आदिवासी बांधवाचे कोसळलेले घर पुन्हा उभे रहाणार

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

मुसळधार पडणाऱ्या पावसात सारडे बेलवाडी येथील एका आदिवासी बांधवांचे घर कोलमडून पडले. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. याबाबत सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत पुन्हा नव्याने घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सोमवार दिनांक १९ जुलै रोजी दुपारच्या वेळेस चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर ( झोपडी) सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पावसामुळे कोलमडून पडले. सुदैवाने घरातील दोन्ही माणसे मच्छी पकडण्यासाठी खाडी वर गेली असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घर कोसळताना प्रचंड मोठा आवाज झाला तेंव्हा बाजूच्या घरात राहणारे आदिवासी बांधव मदतीला धावून गेले.

ज्या घरात ते कुटुंब गेली अनेक वर्ष राहत होते ते घर पूर्णपणे उध्वस्त झाले होते. चंदा आणि तिचा पती घरी आल्यावर त्यांनी टाहो फोडला. पण हिम्मत न हरता त्यांनी त्या घरासाठी वापरलेले सामानामधील जे काही चांगले होते ती कौले बाजूला करून ठेवली.
पाऊस जोरदार असल्यामुळे आजच्या दिवस शेजाऱ्यांकडे वास्तव्य करून, उद्या पासून पुन्हा नव्याने घर बांधायचा निर्धार त्यांनी केला.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी तलाठ्याला आणि गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी ग्रामसेविका यांना आदेश देवून तातडीने पंचनामा करून शासनाकडून जे शक्य असेल ती मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. आपल्या घरी एक दिवस पाणी आले नाही तर आपण जीवाचा आकांडतांडव करतो, पण मी आज आदिवासी बांधवांकडून एक गोष्ट शिकता आली की कितीही मोठे संकट आले तरी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचे.

हा मेसेज सर्व ग्रुप वर पोहोचल्यावर सर्व कडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी बेलवाडी वरील सर्व कुटुंबांना अन्नधान्य दिले. तसेच उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सदर कुटुंबास भांड्यांचा सेट देण्याचे आश्वासन दिले आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी मदत करावी असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी अणि सरचिटणीस संतोष पवार यांनी केलेले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.