Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

मराठा आरक्षण मिळालच पाहिजे त्याचबरोबर ओबीसींचे राजकीय आरक्षणही टिकल पाहिजे
— खासदार सुनील तटकरे

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

‘नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विविध समाजाच्या आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाचा चेहरा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला छगन भुजबळ यांनी दाखवून दिला. मात्र मराठा आरक्षण मिळालच पाहिजे त्याचबरोबर ओबीसींचे राजकीय आरक्षणही टिकले पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष स्वबळाची भाषा करते. कुणाशी आघाडी की महाआघाडी याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये. त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्याच्या कामाला लागावे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला असेल.’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक कर्जत – दहिवली मधील राष्ट्रवादी भवन मध्ये आयोजित केली होती. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश निरीक्षक संजय वढावकर, उपाध्यक्ष दाजी विचारे, जिल्हा महिलाध्यक्ष गीता परलेचा, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, राजीप उपाध्यक्ष सुधाकर घारे, दत्ता मसुरकर, हनुमान पिंगळे, कृषी सभापती बबन मनवे, समाजकल्याण सभापती गीता जाधव, मधुकर पाटील आदी उपस्थित होते. सुधाकर घारे आणि अंकित साखरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

तटकरे पुढे म्हणाले, ‘काहीही असले तरी शेतकरी कामगार पक्षाची वैचारिक बैठक आणि त्यांना मानणारे कार्यकर्ते व मतदान लक्षणीय आहे हे नाकारता येत नाही. काँग्रेसचाही आधार आपल्याला असतो. यापुढे निवडणूक कशी असेल ते वेळ आल्यावर आपले नेते शरद पवार ठरवतीलच. आपले खासदार अन्य पक्षाच्या तुलनेत कमी आहेत. तरीही आपले नेते शरद पवार कुणालाही भेटत असले तरी सोशल मीडिया किंवा वर्तमान पत्रात त्यांचीच चर्चा होत असते. असे नेते आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश लाड यांचे काम चांगले आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आमदार, पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना कराव्यात. म्हणजे कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटू शकतील. खोपोली मध्ये पक्षाचे कार्यालय 15 ऑगस्ट पर्यंत सुरु करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निरीक्षक वढावकर यांनी पक्षाची ध्येय व तत्वे सांगून प्रदेश कडे सोशल मिडियाद्वारे कार्यक्रमांची माहिती पाठवण्याचे आवाहन केले. मधुकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अनिकेत तटकरे यांनी, ‘पक्ष बळकटी साठी वेळ द्यावा. जिल्ह्यात आम्हाला प्रत्येक महिन्याला बोलविल्यास आम्ही नक्की येऊ. असे सूचित केले. सुरेश लाड यांनी सर्वानी सहकार्य केल्यास जिल्ह्यात आपला पक्ष नंबर एक चा पक्ष होईल.’ असे सांगितले.

यावेळी खालापूर तालुक्यातील शेकाप, शिवसेना व भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, रजनी गायकवाड यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.