कथाविविधा *माऊली*
जून महिना सुरु झाला की बाबांची गडबड सुरु व्हायची. शेतीच्या कामाची सगळी बैजवार लावली की पुढली सगळी कामं तो आई आणि आजीच्या आणि त्या पावसाच्या भरोशावर सोडून द्यायचा. नाहीतरी पेरणी, लावणी झाल्यावर आठपंधरा दिवस तसेही काही काम नसायचे. बाबांची मग वारीला जायची तयारी सुरु व्हायची. अंथरुणं, पांघरूणं, औषधे, खाण्याचे सामान, काय आणि किती तो बरोबर न्यायचा.
बाबाची पंढरपूरवारी ही आमच्या घरी नवस वाटण्यासारखी गोष्ट होती. आमच्या घरात पिढ्यानपिढ्या वारीला जायची रीत होती. माझे आजोबा मोठे विठ्ठलभक्त होते. उठताबसता त्यांच्या तोंडात विठ्ठलाचे नाव असायचे. अशाच एका वारीला अचानक छातीत दुखायला लागून त्यांना हार्ट अॅटॅक आला. त्यातच ते गेले. माझा बाबा पक्का नास्तिक पण आजोबांनंतर तोही दरवर्षी न चुकता वारीला जाऊ लागला. वारीवरुन घरी आल्यावर मात्र तो ना देवाकडे वळून पाहातो ना पुजेकडे. तो कधी साधा देवळातही जात नाही. आम्हाला खरच बाबाच्या वारीचे खूप कुतूहल आहे. बाबाला काही विचारले की तो गालातल्या गालात हळूच हसायचा. मी दरवर्षी बाबाकडे हट्ट करायचो मी येणार म्हणून, पण बाबा, “तू लहान आहेस, तुझी शाळा बुडेल” अशी कारणे द्यायचा. माझे त्याच्याबरोबरच जाणे शिताफीने टाळायचा.
यावर्षी मात्र मी चंगच बांधला. वर्षाच्या सुरुवातीलाच मी हेडमास्तरांकडून परवानगी काढून ठेवली होती. अभ्यासही करून ठेवला होता. वारीला जायचे कारण सांगितल्यावर सरांनी देखील लगेच परवानगी दिली. या वर्षी मी पंधरा वर्षाचा झालो.आता बाबाला नाही म्हणायला काही जागाच नव्हती. त्याच्या सगळ्या अटी, सुचना मी मान्य केल्या. जसजसे वारीला जायचे दिवस जवळ यायला लागले तसतशी माझी उत्सुकता वाढायला लागली. अनेक प्रश्न विचारून मी त्याला भंडावून सोडत होतो. तो जवळपास प्रत्येक प्रश्नाचे माझे समाधान होईल असे उत्तर द्यायचा. फक्त एका प्रश्नाला तो नेहमी बगल द्यायचा. “विठोबाची मुर्ती कशी दिसते? देवळात गेल्यावर कसे वाटते?” असे विचारले की तो हळूच हसायचा. म्हणायचा. “आता तू येणार आहेस ना? मग तूच बघ”
एकदाचा तो दिवस आला. आम्ही इतर वारकऱ्यांच्या सोबत वारीला निघालो. वारीत आमच्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांसारखाच इतर वारकऱ्यांना देखील बाबा माहित होता. कुणाला काही हवे असेल, काही लागलं, बर नाहीसे झाले की ते बाबाला हुडकत यायचे. बाबापण हसतहसत त्यांना पट्टी करून द्यायचा. कधी जवळचे औषध द्यायचा. वारकरी आयाबायांशी अगदी घरातल्या माणसासारखे बोलायचा. वेळप्रसंगी एखाद्या आजीला पाठुंगळीला घ्यायचा. वारकरी मध्येच रिंगण घालून नाचायचे, भजन म्हणायचे. हा पण त्यांच्या बरोबर नाचत, गात होता. पण मग हळूच त्याने मुलींचे शिक्षण, गावातल्या चालीरीती यावर बोलणे सुरु केले. लोकांना त्याचे सगळेच पटायचे असे नाही पण ते त्याचे ऐकून घेत होते. पंधरा दिवस बाबाचा हाच उद्योग चाल आहे. तो धड झोपला नाही. खाण्यापिण्याकडेही त्याचे फारसे लक्ष नव्हते. माझी मात्र तो नीटपणे काळजी घेतो. त्याबरोबरच इतर वारकऱ्यांची सोय होते की नाही? कुणी उपाशी नाही ना? कोणी आजारी नाही ना याकडेच त्याचे बारकाईने लक्ष होते. प्रत्येकवेळी मुक्काम हलवताना आजूबाजूच्या परिसराची नीट स्वच्छता करण्यासाठी तो आग्रही होता.
हे सगळे दिवस मी सतत बाबाबरोबरच अगदी त्याला चिकटून होतो. एकतर नवीन वातावरण आणि ही ऽऽ गर्दी! मी तर बावरूनच गेलो. एक मात्र खरे की या दिवसात मला एक वेगळाच बाबा पहायला, अनुभवायला मिळाला.
उद्या आम्ही पंढरपूरला पोचणार. इतके दिवस मनात बाळगलेले स्वप्न आता खरे होणार! आम्ही पंढरपूरला पोचलो. चंद्रभागेच्या वाळवंटात तर अक्षरशः माणसांचा पूर लोटला होता. देवळाकडे जाणारा रस्ता ओसंडून वाहात होता. प्रत्येकजण आपल्याला दर्शन घडेल ना? या विवंचनेत होता. बाबाला मात्र कसलीच घाई नाही की फिकीर नाही. मी त्याला म्हटलेसुद्धा “आता आपल्याला दिवसभर लाईनीत उभे राहावे लागणार. देवाचे दर्शन कधी होईल कोणास ठाऊक.”
बाबाचे उत्तर ऐकून मी चाट पडलो. तो म्हणाला मला नाही जायचय कुठेही. अरे आत्तापर्यंत एकदाही त्या देवळातल्या विठोबाची भेट घेतलेली नाही. “
” काय सांगतोस? तू भेट घेतलेली नाहीस? मग वारीला कशाला आलायस?”
” कशाला म्हणजे? विठ्ठलाला भेटायला”
मी चक्रावलो. मला काही सुधरत नाही. आम्ही त्यातल्यात्यात जरा रिकामा कोपरा शोधला आणि वाळवंटातच बसकण मारली. तो म्हणाला” अरे दहा वर्षांपूर्वी तुझ्या आजोबांना वारीतच अॅटॅक आला. औषधपाण्याची, डॉक्टरांची सोय नसल्याने माझे बाबा तडकाफडकी गेले. तेव्हापासून ठरवलेले आहे. आपण वारीला जायचे. अडल्यानडल्याला मदत करायची. कोणी वारकरी आजारी पडला की मला त्याच्यात माझे बाबाच दिसतात. त्यावेळी मी जे करू शकलो नाही ते मी आत्ता करतोय. मला माहित आहे की याने माझे बाबा परत येणार नाहीत. पण वेळीच मदत मिळाल्याने कोणाचेतरी आईबाबा त्यांच्या लेकरांकडे सुखरूप परत जाऊ शकतील हे माझ्यासाठी खूप आहे. आणि देवळात जाऊन तरी काय करणार? देवाला अभिषेक, नैवेद्य दाखवणार. त्यानेच निर्माण केलेली फुले त्याच्याच पायावर वाहणार. आपण तर अभिषेक आणि नैवेद्य आधीच केलाय. वारकऱ्यांच्या जखमा धुवून आपण विठ्ठलावर अभिषेकच तर केलाय. गरीबगरजूंना अन्न दिले तर त्या देवाला नैवेद्य पोचेल ना! कुठे त्या देवळातल्या दगडात देव शोधतोस? माझा विठ्ठल तर मला वारीतच भेटला. आता त्या मुर्तीला बघण्यासाठी कशाला एवढी यातायात करू? फक्त हे आपले दोघांचेच गुपीत आहे हं. घरी सांगू नको नाहीतर माझी वारीच बंद होईल “
माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या त्यामुळेच बहुतेक पण मला माझ्या समोर बसलेल्या विठ्ठलाची मुर्ती धूसर दिसत होती !!
डॉ. समिधा गांधी, पनवेल
Be First to Comment