सण नागपंचमीचा
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण! या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता,म्हणून या दिवशी नागपंचमी साजरी करतात असे म्हणतात.
याची एक आख्यायिका आहे …..
एकदा एक शेतकरी त्याचे शेत नांगरत असताना नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे.या दिवशी नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
नाग हा खरं तर शेतक-याचा मित्र, तो जमीनीखाली राहून शेतातील उंदीर, घुशी खातो त्यामुळे पिकांची नासाडी टळते..म्हणून बहुतेक शेतकरी या दिवशी वरील नियमांचे पालन करत असतील…
खरंच आपली भारतीय संस्कृती किती महान आहे ना..प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्त्व, प्रत्येक गोष्टीची पूजा करून आभार मानणे…यावरून समजते की अन्न, वस्त्र, निवारा याच बरोबर प्राणी, पक्षी, झाडं, वेली,गवत हे सर्व आपल्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे……
लेखिका: मुग्धा भागवत, नवीन पनवेल
Be First to Comment