Press "Enter" to skip to content

उरणचे पाणी संकट संपले, रानसई धरण ओव्हरफुल

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण ओव्हरफुल होऊन वाहू लागले असल्याची माहिती एमआयडीसी कार्यालयाचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. यामुळे उरणकरांचे पाणी संकट टळले आहे.

रानसई धरण क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसात चांगला पाऊस झाल्यामुळे सोमवारपासून धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. सध्या या धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फुटांच्या वर असल्याची माहिती एमआयडीसीच्या येथील कार्यालयाचे उप अभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.

जून महिन्यातही पावसाने जोर पकडल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रानसई धरणाची उंची १२० फूट असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.६ फूट एवढी झाली की धरण ओसंडून वाहते. अर्ध्या अधिक तालुक्याची तहान रानसई धरण भागवते. या धरणातून सध्या उरण नगर परिषद, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसी पाणी कपात केली जात होती.

जून महिन्यात ही पाऊस मुसळधार पडला होता. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठ्यात वाढ झाली होती. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. परंतु गेली २ ते ३ दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर पकडल्याने आज सोमवार पासून रानसई धरण ओव्हरफुल होऊन वाहू लागले असल्याची माहिती एमआयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. यामुळे उरणकरांवरील पाणी संकट टळले आहे. त्यामुळे लवकरच पाणी कपात बंद करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या सुत्रांनी दिली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.