Press "Enter" to skip to content

माथेरान च्या “त्या” दहा भाजपवासी नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत शिवसेनेने बंडखोर नगरसेवकांना बजावलेल्या नीटिसीला “त्या” नगरसेवकांनी दिले होते आव्हान

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता स्थापन असताना पक्षातील काही मतभेदांमुळे साडेचार वर्षानंतर एकूण दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला काहीशा प्रमाणात निश्चितच फरक पडला आहे.

माथेरान नागरपालिका जेमतेम 3500 मतदार संख्या असलेली एक लहान पालिका आहे तरीही येथे सतरा नगरसेवक आहेत व प्रत्येक निवडणुकीमध्ये येथे सत्तांतर घडतेच त्यामुळे निवडणुकीपूर्वी येथील राजकीय पक्ष नेहमीच सक्रिय झालेले पहावयास मिळतात मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेचे आघाडी व युतीच्या मार्फत अनेक वर्षे सत्ता उपभोगली होती पण मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडून अनेक जण शिवसेनेमध्ये जाऊन स्वबळावर सत्ता स्थापन केली होती व ह्या काळात माथेरानमध्ये अनेक विकास कामे झाली होती व त्याद्वारे शिवसेना पुन्हा स्थापन करणार असे चित्र दिसत असताना पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण झाले व शिवसेनेचे तब्बल दहा नगरसेवक व पदाधिकारी भाजपमय झाले व शिवसेनेला ब्रेक लागण्याचे काम झाले ह्या एका घटनेने माथेरानचे राजकारण बदलले व आगामी निवडणुकीमध्ये सर्वाना समान संधी उपलब्ध झाल्याने सर्वच राजकीय पक्ष पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे निवडणुकीची पहिली पायरी म्हणजे पक्षप्रवेशाने सुरुवात झाली आहे.

माथेरानच्या पालिका निवडणूकी मध्ये भाजपा ची ताकद नगण्य होती पण त्यांच्या सहकार्यामुळे अनेकांना पालिकेमधे प्रवेश मिळाला आहे मागील काही दिवसांच्या घडामोडीने भाजपा ला उर्जित अवस्था प्राप्त झाली असून तब्बल नऊ नगरसेवक त्यांच्या बरोबर असल्याने एक मोठी फळी त्यांच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली असून पक्ष प्रवेशास सुरुवात केली आहे. पण शिवसेनेने त्यांना लगाम घालण्यासाठी मा रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पक्षविरोधी कायद्याअंतर्गत नगरसेवक पद रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे.

माथेरान नगरपरिषदेच्या सत्ताधारी शिवसेना पक्षातून भारतीय जनता पक्षात पक्षांतर केलेल्या दहा नगरसेवकांना आज मुंबई उच्च न्यायालयात एका रिट याचिकेत अपयशाला सामोरे जावे लागले.

दिनांक २७ मे २०२१ रोजी, शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून विजयी झालेले ९ नगरसेवक आणि सत्ताधारी शिवसेना पक्षाने स्विकृत सदस्य म्हणून नियुक्त केलेले श्री. चंद्रकांत धोंडू जाधव हे दहावे नगरसेवक अश्यांनी शिवसेना पक्षातून भाजप मध्ये प्रवेश केला. तद्नंतर दिनांक ३ जून २०२१ रोजी त्यांनी त्यांच्या पक्षांतराबाबत पत्रकार परिषद भरवून आपली बाजू मांडली होती.
दहा नगरसेवकांच्या पक्षांतरा नंतर दिनांक २१ जून २०२१ रोजी प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग, रायगड यांनी सर्व दहा नगरसेवकांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ अन्वये नोटीस बजावली होती. सदर नोटीशीस पक्षांतर केलेल्या दहा नगरसेवकांनी रिट याचिके द्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. महाराष्ट्र शासन, मा जिल्हाधिकारी, गटनेते प्रसाद सावंत, सचिव श्री अनिल देसाई, माथेरान मुख्याधिकारी यांना त्यांनी याचिकेत प्रतिवादी केले होते, 21 जून 2021 ची सुनावणी नोटीस नियमाला अनुसरून दिली नाही तसेच राजकीय दबावाखाली सुनावणी लावण्यात आली असे याचिकेत नमूद करून मा उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा आणि वेळकाढू पणासाठी प्रयत्न करण्यात आला, सदर याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे होऊन बंडखोरी केलेल्या दहा नगरसेवकांची याचिका फेटाळण्यात येऊन त्यांच्यावर न्यायालयाने फटकारे ओढले.

याप्रकरणी नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्री. प्रसाद विश्वनाथ सावंत यांनी उत्तरादाखलच्या प्रतिज्ञापत्रात दहा बंडखोर नगरसेवकांनी केलेला बनाव न्यायालयाच्या निदर्शनास। आणला. या रिट याचिकेत शिवसेनेचे गटनेते श्री. प्रसाद वि. सावंत यांचेतर्फे प्रदिप म. पाटील, रेवती अवधूत तटकरे व प्रवीण ब. गोळे यांनी वकीलपत्र पाहिले.
आजच्या ह्या निकालानंतर माथेरानमध्ये राजकीय वातावरण तापले असून फोडाफोडीच्या राजकारणाला आता अधिक उधाण येणार आहे मागील काही दिवसांमध्ये झालेले पक्ष प्रवेश हे येथील चर्चेचे विषय ठरले होते एकाच व्यक्तींचे दोन दोन राजकीय पक्षात प्रवेश झाल्याने पक्षप्रवेश वरून येथील राजकारण कोणत्या थराला गेले आहे ह्याचीच चर्चा सर्वत्र केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.