Press "Enter" to skip to content

वीज गेल्याने ग्राहकांना मन:स्ताप : पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

नागोठणे भागात चोरट्यांचा मोर्चा आता वीज कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल चोरीकडे

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे शहर व विभागातील जनता तासन् तास गुल होणाऱ्या विजेच्या समस्येने आधीच त्रासलेले असतांनाच चोरट्यांकडून ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल काढून ते चोरण्यात आल्याने १० जुलैच्या मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागोठणे शहर व ग्रामीण विभागातील वीज ग्राहक नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. या घटनेतील दोन्ही ट्रान्सफॉर्मर मधून चोरट्यांनी सुमारे ४४ हजार किंमतीचे एकूण ५५० लिटर ऑईल लंपास केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार १० जुलैच्या मध्यरात्री नागोठणे व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला म्हणून वीज वितरण कंपनीचे येथील सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड रात्री १.३० वा. कार्यालयात आले. त्यांनी कानसई येथील विद्युत उपकेंद्रात चौकशी केली असता मोठ्या तीन फेज विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याचे व संपूर्ण विद्युत वाहिनीची तपासणी करून त्याचा अहवाल दिल्या नंतरच विद्युत पुरवठा सुरु करण्यात येईल असे वीज उपकेंद्रातून स्पष्ट करण्यात आले.

वीज वाहिनीतील तांत्रिक बिघाड हा अज्ञात असल्याने गायकवाड यांनी रात्री १.३० वा. वीजवाहिनी तपासण्यास सुरुवात केली. संपूर्ण वीजवाहिनीचे अंतर हे ५० कि.मी. असल्याने शक्य तेवढी वाहिनी रात्री ३.३० पर्यंत तपासली असता नागोठण्यातील चर्च जवळील विद्युत रोहित्राचे कॉक तोडून अज्ञात व्यक्तींनी त्यामधील ऑईल चोरल्याचे व काही ऑईल जमिनीवर सांडून नुकसान झाल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले.

ऑइल चोरी करणाऱ्यांनी त्या रात्री वीज वाहिनीचे तिन्ही फेज शॉर्ट केले होते. त्यामुळे वीज वाहिनीतील बिघाडाचा उलगडा झाल्याने काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.



त्यानंतर ११ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता वीज वाहिनीत कुठे तरी पुन्हा मोठा बिघाड झाल्याचे उपकेंद्रातून समजले. त्यामुळे उपकेंद्रातून संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्याचवेळी येथील बाळसई गावातील विद्युत जानित्रातून मोठा आवाज आल्याचे बाळसई मधील नागरिकांनी वैभव गायकवाड यांना फोनद्वारे सांगितले.

त्यावेळी बाळसई येथे जाऊन त्यांनी पाहणी केली असता तेथील विद्युत जनित्र मधील ऑईलही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बाळसई गावाचा विदयुत पुरवठा बंद करून इतर गावांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

त्यामुळेच वीज वाहिनीत यापूर्वी होणारे तांत्रिक बिघाड हे मानवनिर्मित होते हे निदर्शनास आले. आजपर्यंत होणारे तांत्रिक बिघाड हे निसर्गनिर्मित असायचे पण आता मानवनिर्मित बिघाड सुरु झाल्याने गायकवाड यांनी चिंता व्यक्त केली. याप्रकरणी त्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान दोन विद्युत जनित्र मधील ऑईल चोरण्याची घटना ताजी असतांनाच सोमवारी(दि.१२) रात्री नागोठण्याजवळील वजरोली येथील विद्युत जनित्र मधील ऑईलही चोरी झाल्याची माहिती वीज कार्यालयातून मिळाली. तसेच रोहा येथेही अशाच प्रकारे ऑईल चोरण्याच्या घटना घडल्याने यामागे चोरट्यांचे एक रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

दरम्यान वीज वितरण कंपनी कडून वीज दुरुस्तीची कामे करण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात वारंवार शट डाऊन घेण्यात येते. यावर्षीही अनेकवेळा शट डाऊन घेण्यात येवूनही नागोठण्यात सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे यासंदर्भात वैभव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शट डाऊन मध्ये वीज वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम प्रामुख्याने करण्यात येत असते. विजेतील तांत्रिक बिघाड हे कधीही सांगून येत नसतात. जेव्हा तांत्रिक बिघाड होतात तेव्हा त्याचा तपास करून ते दोष दूर करण्याचे काम करण्यात येते.

सध्या पावसाळा असल्याने वीज वाहिन्यांवर बसणाऱ्या कावळ्यांमुळे शॉर्ट सर्किट होवून, वाहिनी ट्रीप होवून वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे वीजवाहिन्यांत कधीही कुठेही बिघाड झाल्यास आम्ही त्याचा तपास करून त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र नागोठणे विभागातील वीजवाहिनीचे अंतर खूप मोठे असल्याने तांत्रिक बिघाड सापडण्यास कधी कधी उशीर झाला तर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासही उशीर होतो असेही वैभव गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.