निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांचा सलग २४ वर्षं फळांच्या बियांचे बीजारोपणाचा उपक्रम
सिटी बेल| उरण | घन:श्याम कडू |
आपला परिसर ओद्योगिक विकासाच्या नावाखाली निसर्ग सौदर्य नष्ट होत चालले आहे. त्याची झळ आपण कोरोनाच्या रुपाने सहन करीत आहोत. यावर मात करण्यासाठी निसर्गाचे जतन करणे गरजेचे बनले आहे. उरणमधील निसर्गप्रेमी असलेले हितेंद्र घरत हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून बिजारोपणाचा कार्यक्रम करीत आहेत. त्यांचे हे सलग २४ वे वर्षे स्वखर्चाने कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी करीत आहेत. त्यांचा या उपक्रमामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. तरी त्यांचे अनुकरण इतर निसर्गप्रेमींनी करणे आवश्यक आहे. आज त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी द्रोणागिरी गडावर १ लाख २० हजार बियांचे बीजारोपण करण्यात आले.
गेली दीड दोन वर्षे आपण सर्वजण कोरोना महामारीचा सामना करीत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याने अनेकांना जीवाला मुकावे लागले. त्याला ही आपणच जबाबदार आहोत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. वाढत्या औद्योगिकारणामुळे निसर्ग लोप पावत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ही ढासळत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहे. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत हे गेली २४ वर्षे फळांच्या हजारों बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकीत आहेत. त्यातील शेकडोंच्या संख्येने झाडे जगून याचा फायदा तुम्हा आम्हाला व प्राण्यांना तसेच निसर्गाचीही जपवणूक करण्याचा त्यांचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे.

थेंब थेंब पाणी साचून तळे बनते एक एक झाडांपासून जंगल बनत म्हणून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. पेरू तरच उगवेल या उक्ती प्रमाणे मे महिना म्हणजे फणस, आंबे, काजू ,चिंच , करवंदे ,जाम, जांभळे ,रांजणे अशा अनेक फळे खायची चंगळ असते. परंतु आपण या फळांचा आस्वाद घेऊन त्यांच्या बिया फेकून देतो. मात्र तसे न करता खाल्लेल्या फळांच्या बिया एक भांड्यात जमा करा. उदाहरणार्थ, तुम्ही आमरस केला त्या आंब्याचे बाठे, जांभळाचा रस काढलात त्या जांभळाच्या बिया, चींच जेव्हा कटिंग करतो त्याचे निघालेले चिंचोके, काजू ,फणस खाल्ल्यानंतर त्याच्या निघालेल्या बिया अशा अनेक फळांच्या बिया कृपया फेकून देऊ नका. त्या जमा करा त्यांना चांगल्या उन्हात सुकवा. नंतर एका पिशवीत किंवा गोणीत भरून ठेवा व त्या सर्व सुकलेल्या बिया पावसाळा सुरू होण्याअगोदर कुठल्या तरी किल्ल्याच्या सभोवती किंवा रानात, जंगलात किंवा कुठल्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूस थोड्या थोड्या टाकत जा त्यातील काही झाडे नक्कीच जगातील.
जर आपण एक हजार बिया या वर्षी पेरल्यात तर त्या बियांपैकी काही झाडे तरी नक्कीच उगवतील. यामुळे तुमच्या कष्टाचे सार्थक झाले असे समजा. आपण सर्व या धरती मातेचे व सृष्टीचे देणेदार आहोत.

अशा प्रकारचा उपक्रम उरण केंगाव येथील सिडको कर्मचारी असलेले हितेंद्र सदाशिव घरत. गेली २४ वर्ष न चुकता लाखापेक्षा जास्त बिया दरवर्षी कुठल्या ना कुठल्या जंगलात पेरत आहेत. जर आपल्यापैकी कोणाला हे करणे जमत नसेल तर त्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया गोळा करून ठेवून त्यांना फोन केल्यास त्या ते स्वतः घेऊन जातील असे आवाहन त्यांनी मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक व जनतेला केले आहे. निसर्गप्रेमी हितेंद्र घरत हे फळांच्या बिया गोळा करून साफ करून उन्हात सुकवून घेतात. या कामी त्यांना घरातील सर्व सहकारी त्यांच्या पत्नी, मुले हे जीवापाड मेहनत घेत असल्यामुळेच सहज शक्य होत आहे.

हितेंद्र घरत यांच्यासह नवपरिवर्तन संस्थेची टीम, शिक्षक नेते कौशिक ठाकूर, महेश गावंड व त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्या सहकार्याने आज द्रोणागिरी गडावरील परिसरात १ लाख २० हजार काजू, फणस, जांभूळ, आंबे, चिंच आदी बियांचे बीजारोपण करण्यात आले.

वाढत्या औद्योगिकारणामुळे झाडांची कत्तल होऊन निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याने त्याच्या दुष्परिणामाचा सामना कोरोनाच्या रूपाने तुम्हाआम्हांला करावा लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याने आपले जवळचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार जीवाला मुकले आहेत. यातून सुटका करण्यासाठी व निसर्गाची जपवणूक करण्यासाठीच झाडांच्या बिया पेरण्याचे काम गेली २४ वर्षे करीत आहेत, यापुढेही करीत रहाणार आहे. यातील हजारो झाडे जगातील व त्यांच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेऊन पक्षी, प्राणी व गोरगरिबांना फळे विकून उदरनिर्वाह करणे शक्य होईल. तसेच यामुळे निसर्गाची जपवणूक केल्याचा आगळा वेगळा आनंद मिळत असल्याचे निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांनी सांगितले.








Be First to Comment