मनमानसी
भाग क्रमांक ११
अति तेथे माती…
समर्थ रामदास स्वामींनी माणसाच्या स्वभावाविषयी खुप सुंदर रचना लिहून ठेवल्या आहेत, अतिशय महत्वाच्या २० कडवी असलेले ते २० रत्नच आहेत..!
त्यात सांगितले आहे कि, कामाच्या ठिकाणी, किंवा रोजच्या जीवनात आपली सद्वविवेकबुद्धी जागृत ठेवूनच वागायला पाहिजे. पण माणूस रागावर नियंत्रण न ठेवता उचलली जीभ कि लावली टाळ्याला, वाट्टेल तसे असंबद्ध बोलतच, शब्द बाण सुटतो.. आणि मग नात्यात कायमचा दुरावा येतो.. अति बोलण्याने परिस्थिती हाताबाहेर जाते.
तसे अति काळजी केल्यावर पण परिस्थिती बदलत नसतेच.उलट मन व हृदयावर त्याचे वाईट परिणाम होतात.
तसेच आजकालच्या युगात प्रामाणिक ,नम्र असायलाच हवे पण ते अति प्रमाणात नसावे.कारण त्यांच्या स्वभावाचा फायदा अनेक जण घेतात.
नात्यांमध्ये अति स्नेह ठेवला तरी.अति परिचयात अवज्ञा..अशी अवस्था होते. असलेले संबंध बिघडायला वेळ लागत नाही, म्हणूनच थोडक्यात गोडी असावी, मग ती खाण्यात असो वा वागण्यात ..एकदा का गैरसमज निर्माण झाला कि मग तो काही केल्या दूर होत नाही.
काही जणांच्या अंगी आळस खुप असतो..झोप आणि आळसामुळे माणसाची प्रगती खुंटते, कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.त्याला कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायलाच हवेत.
काहींना अति बढाया मारायची सवय असते. पण त्याच्या काही मर्यादा असतातच ना..! मग ते बोलणे ऐकून शेवटी समोरील व्यक्ती त्याला दूरुनच बघून दुसऱ्या रस्त्याने पळ काढणारच ..म्हणूनच बोलणे थोडक्यात पण नेटके, मधुर असले तर मग ऐकतच रहावेसे वाटते.
आजकालच्या यांत्रिक युगात Automatic वस्तुंच्या अति वापराने शरीर व बुद्धीला गंज पडायची वेळ आली आहे.एखादा प्रश्न निर्माण झाला, कि कोणत्याही प्रकारचा ताण न देताच मोबाईल वर Google search केल जातं कि लगेच उत्तर हजर..! अगदी प्रत्येक वस्तू Automatic असल्याने शरीराची हालचाल किंवा झीज व्हायलाच नको..सगळीच कामे काही हाताच्या बोटावरचा खेळ झाला आहे..! त्यामुळेच Comfort जपण्यात आपले सगळे आयुष्य चालले आहे.
तुम्ही म्हणाल मस्त आहे ना..! तेवढाच वेळ वाचतो, आराम पण होतोय..! पण सवयीमुळे थोडे चाललो, किंवा वजन उचलले कि धाप लागते, आणि मग घाम येतो, हुश्श करून लगेच A/C चा रिमोट हातात येतो..कारण तेवढी गर्मी सहन होत नाही. अंगमेहनतीची कामे नसल्यामुळे शरीरात नैसर्गिक रित्या घाम येतच नाही. कारण या यांत्रिक युगात पोळ्या लाटायच्या मशीन पासून लिफ्ट पर्यंत सगळे काही एका बटणावर..! कारण वेळच नाहीये..! अॉफिसला निघायचे आहे मग पटापट कणिक Food proceser मधून काढायची आणि पोळ्याच्या मशीनमध्ये कणकेचा गोळा ठेवला कि झाली गरमागरम पोळी तयार..! एकीकडे ते काम चालू असतांनाच वॉशिंग मशीनचे बटण दाबले कि,तो त्याचे काम शिस्तीत करतो. भराभरा डबा भरला कि, लिफ्टचे बटण दाबायचे. म्हणजे या सगळ्या दैनंदिन अति comfort life मध्ये आपण आपले आरोग्य व आजारांना नकळतपणे आमंत्रण देत आहोत.
जग बदलत तसे आपणही त्यात बदल करणे योग्यच आहे..पण जिथे आवश्यक आहे तिथेच यांत्रिक उपकरणांचा वापर करावा, जेणेकरून आपल्या शरीर लवचिक राहील, म्हणजे कणिक हाताने मळणे, वेळ काढून किमान एकवेळ तरी पायऱ्या चढायला काहीच हरकत नाही. शक्य तिथे शारीरिक हालचाल होईल व घाम पण नैसर्गिक रित्या येईल..असा प्रयत्न नक्की करावा कारण या विज्ञानाने आपले शरीर पंगू करण्याचा मुळी घाटच घातला कि काय..! असे वाटते. सध्या देशाची प्रगती आणि आपल्या जीवनात अधोगती होतच आहे.
अनेक गोष्टींचा अतिरेक न करता, सगळ्या गोष्टी प्रमाणात केल्या तर उत्तम आरोग्य म्हणजे शरीर,मन उत्तम असेल तर आयुष्य सुख समाधानाने व्यतीत करता येईल. बरोबर ना ?
सौ. मानसी जोशी
पनवेल.
Be First to Comment