Press "Enter" to skip to content

सलग दुसऱ्या वर्षी गणेश मूर्तिकार, कारखानदार आर्थिक अडचणीत

गणेश मुर्ती बाजारात दाखल पण.. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

शुक्रवार 10/ 9/2021 रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून रविवार दिनांक 19/9/ 2021 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यात येणार आहे. आता काही महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने उरण मधील बाजारपेठेत सुंदर व आकर्षक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती दाखल झाले आहेत.


बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेश मूर्तीना मोठी मागणी असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती खूप मोठ्या प्रमाणात उरण मध्ये दाखल झाले आहेत.अनेक गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्तीची बुकिंग सुद्धा करून ठेवली आहे. पाचशे रुपयांपासून ते तीन हजार,पाच हजार रुपये पर्यंत गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.पण यंदा मात्र गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट, सावट असल्याने गणेश मूर्तिकार, कारखानदार तसेच गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.


महाराष्ट्र शासनाने कोरोना रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आणले आहेत.यामध्ये गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणेशमूर्तीची उंचीवर दोन फुटाची मर्यादा घालण्यात आलेली आहे. शिवाय मिरवणूक काढता येत नाही तसेच गर्दी होईल व कोरोना वाढेल असे कोणते कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घातल्याने कोणतेही सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम गणेशोत्सव मंडळांना तसेच गणेश भक्तांना आयोजित करता येणार नाही. गेल्या वर्षी गणेशोत्सवाचा आनंदाला कोरोनामुळे मुकावे लागले. यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता येणार नसल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.

गेल्या वर्षभरात झालेले वादळे आणि कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेश मूर्तिकार, कारखानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. गणेश मूर्तिकार,कारखानदार यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे. दरवर्षीसारखे धंदा व्यवसाय यावर्षी नाही.कोरोनामुळे फायदा ऐवजी नुकसानच होत आहे.शासनाने गणेशमूर्तीची उंचीची अट शिथिल करावी. शासनाने कोणताही निर्णय घेताना राज्यातील गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, कारखानदार यांच्याशी चर्चा करूनच नियमावली जाहीर करावे. मूर्तिकार,कारखानदार यांच्यावर असलेले कर्ज माफ करावे. कर्जापोटी कारखानदारांनी, मूर्तीकारांनी आत्महत्या केली त्यांना शासनातर्फे नोकरी देण्यात यावी. तसेच आर्थिक मदत त्यांना देण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत

- किसन म्हात्रे
गणेश मूर्तिकार, उरण,
विनित आर्ट्स (गणेश मूर्तीचे दुकानाचे) मालक

अनेक कुटुंबात पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे मातीच्या गणपती मूर्ती बसविल्या जातात. अनेक कुटुंबाना ऐतिहासिक परंपरा आहे.अश्या घरात दोन फुटांपेक्षा जास्त उंचीचे गणेश मूर्ती असतात. त्या पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे बसवले जातात. मात्र घरातील मातीचा गणपती बसविले जातात त्यावरही शासनाने निर्बंध आणले आहेत.शासनाने असे नियमात शिथिलता आणावी. कारवाई करायची असेल तर शासनाने मातीने बनवलेला लालबागच्या 21  फुटी गणेश मूर्ती बसविणाऱ्यांवर करावी. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला वेगळे न्याय का आहे ? सर्वांना समान न्याय द्या.कोरोनाचे नियम शिथिल करावेत अशी मागणी गणेशभक्त, एक कुटुंब सदस्य म्हणून मी करीत आहे

– हेमंत देशमुख

गणेश भक्त.

(सर्वसामान्य नागरिक)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.