कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देत आहेत विनामूल्य अन्नदान सेवा
सिटी बेल | पनवेल |
पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या सामाजिक जाणिवेतून आजमितीला पनवेलच्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य अन्नदान सेवा देत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिथे योद्धे,वॉरियर्स अशा नावाने पुरस्कार घेणारे आणि देणारे यांची अहमहमिका सुरू असताना काही सजग मात्र शांतपणे आणि विशेष म्हणजे कुठलाही गाजा वाजा न करता आपले योगदान देत आहेत.अशाच सेवाभावी वृत्तीने अन्नदानाचे पवित्र कार्य माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला करत आहेत.
कोरोना विषाणूचा कालखंडात टाळेबंदी असल्यामुळे रुग्णांच्या आप्तेष्टांना जेवण, न्याहारी, चहा मिळणे जिकरीचे झाले होते. हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद असल्यामुळे कोरोना रुग्णांना देखील जेवण देणे काही आप्तेष्टांना शक्य होत नव्हते. उपजिल्हा रुग्णालयात अविश्रांतपणे सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय, मावशी अशा लोकांना घरून जेवण आणणे शक्य नव्हते किंवा हॉटेल्समधून मागवणे देखील शक्य नव्हते. अशा सगळ्यांच्या मदतीला सईद मुल्ला धावून गेले आहेत. उपजिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्वामी मिसळ या हॉटेलचे मालक शितल कोठारी यांच्याकडे मुल्ला यांनी रोख रक्कम अगोदरच देऊन ठेवली.
जे जे गरजवंत आहेत त्यांना खाद्य पदार्थ द्यावेत आणि त्याचे पैसे अगोदर जमा केलेल्या रकमेतून वजा करावे अशा सूचना मुल्ला यांनी शितल कोठारी यांना दिल्या.रक्कम संपल्यावर ते पुन्हा काही अनामत जमा करतात.हे कार्य ते गेल्या दीड ते दोन महिन्यापासून करत आहेत.
यामध्ये इस्पितळात काम करणारे, रुग्णांचे आप्तेष्ट आणि रुग्ण यांस सेवा पुरविली जाते.विशेष म्हणजे कुठल्याही प्रसिद्धी ची अपेक्षा न करता केवळ सामाजिक जाणिवेतून सईद मुल्ला हे कार्य करत आहेत.
सिटी बेल वृत्त समूहावर ही बातमी प्रसिद्ध होणार हे समजल्यावर सुद्धा सईद मुल्ला हे काहीसे संकोचले होते.
दान हे सत्पात्री असावे या भावनेतून कार्य करणाऱ्या सईद मुल्ला यांना सिटी बेल वृत्त समूहाचा सलाम !








Be First to Comment