जेष्ठ पत्रकारांना पेंशन आणि कोविडचा पत्रकार सन्मान योजनेत समावेश करण्याची कर्जतच्या पत्रकारांची मागणी
सिटी बेल | कर्जत |
महाराष्ट्र शासनाने जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याच्या मागणीसाठी आणि शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण योजनेमध्ये कोविड-19चा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले.
दरम्यान,रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश लाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि अदिती तटकरे यांना याच मागणीसाठी निवेदने दिली आहेत.
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून राज्यातील जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे.या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी कर्जत प्रेस क्लब च्या माध्यमातून या विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी भेट घेऊन जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.त्यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील पत्रकारांचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कडून शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण योजने मधून विविध आजारांवर मात केलेल्या अधिस्वीकृती धारक पत्रकारांना त्यांनी त्या आजारांवर मात करताना रुग्णालयात केलेला खर्च दिला जातो.मात्र त्या योजनेतील आजारांमध्ये कोविड-19 या आजाराची शासनाने अद्याप समावेश केला नाही.देशात कोविड हा भयानक आजार येऊन दीड वर्षे होत आली तरी कोविड-19चा त्या आजारांच्या यादीत समावेश नाही.त्यामुळे कोणत्याही अधिस्वीकृती धारक पत्रकारांना शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी या योजनेमधून कोविड वर यशस्वीपणे उपचार घेऊन मात करणाऱ्या मदत मिळाली नाही. कोविडचा समावेश शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान योजनेत समावेश करण्याची मागणीचे निवेदन माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सुतारवाडी येथील कार्यालयात भेट घेऊन दिले.
तर कोविड चा समावेश शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार सन्मान योजनेत करण्यात यावा आणि कोविड या आजारावर मात करणाऱ्या अधिस्वीकृती धारक पत्रकारांना योजनेतून लाभ देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली.रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी तशा आशयाचे निवेदन माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.त्यावेळी उपस्थित असलेले खासदार आणि माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी शासनाने अधिस्वीकृती धारक पत्रकारांना लाभ दिला पाहिजे आणि त्यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाने अध्यादेश काढायला हवा अशी सूचना केली.माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि माहिती जनसंपर्क विभागाचे कॅबिनेट मंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन देऊन पत्रकारांच्या मागणीसाठी आग्रह धरला आहे.खासदार सुनील तटकरे यांनी आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयावर बोलू असे आश्वासन कर्जत तालुक्यातील पत्रकारांना दिले आहे.








Be First to Comment