Press "Enter" to skip to content

रायगड प्रेस क्लब, कर्जत प्रेस क्लब तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराचे आयोजन

पारंपरिक भात शेती करण्यापेक्षा दररोज पैसे मिळतील असे नगदी पीक घ्यावे : डॉ. रवींद्र मर्दाने

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

‘शेती व्यवसाय परवडत नाही असे नेहमीच ऐकायला मिळते मात्र त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण पारंपरिक भात शेती करीत आहोत. मजूर आणि मोकाट गुरांचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. भात पीका बरोबरच खरीप हंगामात भाजीपाला आदी सारखे नगदी पीक घ्यावे. तरच तरुण मुले शेती व्यवसायाकडे वळतील. शेती बरोबरच कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय असे पूरक व्यवसाय सुद्धा करणे आवश्यक आहे. फळबागा तयार केल्यास त्याचे हमखास उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी प्रादेशिक कृषी केंद्र आणि तालुका कृषी विभागाचे सहकार्य घ्यावे.’ असे स्पष्ट प्रतिपादन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी येथे केले.

कृषी दिनानिमित्त रायगड प्रेस क्लब आयोजित कर्जत प्रेस क्लब संयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार 2021 चे आयोजन भालीवडी येथील विहान कृषी पर्यटन केंद्रामध्ये केले होते. जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्यासपीठावर समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंडल कृषी अधिकारी विजय वानखेडे, कृषी सहाय्यक कल्याणी कोरफड, सरपंच राजेंद्र गंगावणे, प्रगतशील शेतकरी अशोक पाटील, काशिनाथ काळण उपस्थित होते.

रायगड प्रेस क्लबचे खजिनदार दर्वेश पालकर, जयवंत हाबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष विलास श्रीखंडे यांनी प्रास्ताविकात गेल्या पंधरा वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती सांगितली. यानंतर भालीवडी गावातील अशोक नारायण पाटील आणि नेरळ नजीकच्या पिंपळोली गावातील काशीनाथ भाऊ काळण या प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन ‘आदर्श शेतकरी पुरस्कार – 2021’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

ग्रामस्थ सुदाम भोईर आणि शेतीची आधुनिक अवजारे बनविणारे निलिकेश दळवी यांनी आपल्या मनोगतातून शेती व्यवसाय कसा परवडू शकतो. याची उदाहरणांसह माहिती सांगितली. गणेश काळण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंडल कृषी अधिकारी विजय वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना शासकीय योजनांची माहिती दिली. ‘कृषी विभागाकडून सहकार्य घेऊन शेती व्यवसाय केल्यास विविध योजनांचा लाभ घेता येईल.’ असे स्पष्ट केले.

याप्रसंगी कृषी खात्याच्या वतीने परसबाग फुलवण्यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. मांडे यांनी अध्यक्षीय मनोगतात, ‘कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणून ठेवले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आत्ताच्या परिस्थितीत नोकरी करण्यापेक्षा शेती व्यवसाय बरा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.’ असे सांगितले. सूत्रसंचालन विलास श्रीखंडे यांनी तर आभार प्रदर्शन भूषण प्रधान यांनी केले.

याप्रसंगी शंकर म्हसे, सुभाष भोईर, प्रमोद माळी, महेंद्र पाटील, भगवान कर्णुक, राजन पाटील, शरद वावळ, आनंद पाटील, काळूराम श्रीखंडे, नरेश पाटील, विश्वनाथ म्हसे, नयन भोईर आदी शेतकरी तसेच गणेश पवार, विकास मिरगणे, श्रीकांत हाबळे, गणेश मते, ज्ञानेश्वर बागडे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.