मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्याकडे तक्रार
सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
उरण परिसरातील समुद्र किनारी बंदी असतानाही मासेमारी करण्यासाठी बोटी जात असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. या बोटींसाठी बंदी असलेला बायो डिझेल व बर्फाची खुलेआम समुद्र किनारी होत असतानाही प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
1 जून ते 31 जुलै 2021 पर्यंत राज्यात यांत्रिक मासेमारी बोटींना पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे.या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.या कालावधीत मासेमारी बंदीमुळे
मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळुन मासळीच्या साठ्याचे जतन होते.तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे कोकण किनार्यावरील शेकडो मच्छिमार बोटी आपापल्या बंदरात नांगर टाकून उभ्या करण्यात आल्याचे सांगतात.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण या हेतूने या वर्षी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्यात सागरी क्षेत्रात सागरी किनार्या पासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी बोटींना पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे.
सर्वसामान्य मासेमारी करणारे ही बंदी पाळतात परंतु जे धनदांडगे व ज्यांचे अधिकारी वर्गाशी आर्थिक साटेलोट आहेत. त्यांच्यासाठी ही बंदी नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वसामान्य मच्छीमार करीत आहेत. आजच्या घडीलाही मासेमारी करण्यासाठी बोटी खोल समुद्रात जाऊन 3 ते 4 दिवसांत परत येत असल्याचे समजते.
याबाबत अधिकारी वर्गांकडे विचारणा केली असता ते कारवाई केल्याचे सांगतात मात्र अधिकृत सर्व माहिती देण्यास लेखी पत्र देण्याची मागणी करतात. पत्र दिल्यानंतर माहिती देईपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी संपून जाईल. मग त्याचा उपयोग काही होणार नाही या मागचा उद्देश असतो.
जर अधिकारी वर्गाकडून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. तरीही मासेमारी करण्यासाठी खुलेआम बोटी खोल समुद्रात कशा जातात. तसेच या बोटींना लागणारे डिझेल ही बंदी असलेल्या बायो डिझेलचा वापर केला जात आहे.
दररोज बायो डिझेलचा टँकर येत असतानाही त्याची माहिती प्रशासना नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच मासळी ठेवण्यासाठी लागणार्या बर्फाच्या गाड्याही खुलेआम समुद्राच्या धक्क्यावर लावून त्याची विक्री करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. मासेमारीस बंदी असतानाही हे सर्व खुलेआम सुरू असतानाही डोळ्यावर गांधारी सारखी पट्टी बांधून त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे याची तक्रार करून मासेमारी करणार्यांना पाठीशी घालणार्या अधिकारी वर्गाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.







Be First to Comment