Press "Enter" to skip to content

डिकसळ ते उमरोली येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेच्या पथदिव्याचे लोकार्पण

निवडणूका समोर ठेऊन आम्ही काम करत नाहीत. नेहमीच लोकांसाठी झटत असतो : राजू पाटील

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

‘लोकांसाठी आपण काम करीत राहिलो की आपोआपच आपण त्यांच्या मनात स्थान निर्माण करतो व आपुलकीची भावना तयार होते. निवडणुका समोर ठेऊन आम्ही काम करीत नाहीत. आज यापरिसरातील लोक रात्री अपरात्री या रस्त्यावरून ये – जा करीत असतात. त्यांची गैरसोय सौरऊर्जेच्या पथ दिव्यांनी दूर होणार आहे. हे पथ दिवे आमच्या पक्षाच्या माध्यमातून उभारले आहेत. या कोविडच्या काळात अनेक फ्रंट लाईन वर्कर आपल्या जीवाची बाजी लावून काम करतात त्यांचा सन्मान कुणी करीत नाही परंतु आमच्या पक्षाने अशा कोरोना योध्दयांचा सन्मान केला आणि आज तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित केले.’ असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी येथे केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून डिकसळ ते उमरोली येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेच्या पथदिव्याचे लोकार्पण, संपर्क कार्यालयाचे उदघाटन व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन उमरोली येथे करण्यात आले होते. पहिल्यांदाच कर्जत तालुक्यात आलेल्या आमदार राजू पाटील यांचे तालुक्यातील शेलू, नेरळ, दहिवली, बिरदोले, बेकरी, माणगाव, अशा अनेक गावात जोरदार स्वागत करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. आमदार पाटील यांनी मानवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांच्या प्रति नतमस्तक झाले. तसेच हुतात्मांचे नातेवाईकांची त्यांनी भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील डिकसळ ते उमरोली या याठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पथदिव्यांचे लोकार्पण केले. तसेच उमरोली येथे संपर्क कार्यालयाचे उदघाटन देखील केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष जे. टी. पाटील, महेंद्र निगुडकर, महिला जिल्हाध्यक्ष सपना देशमुख, कर्जत तालुकाध्यक्ष अंकुश शेळके, खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक, नगरसेवक हेमंत ठाणगे, माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम, नेरळ शहराध्यक्ष मिलिंद मिसाळ, कर्जत शहराध्यक्ष समिर चव्हाण, उपाध्यक्ष यशवंत भवारे, अकबर देशमुख, विलास डुकरे, प्रवीण बोराडे, महेंद्र निगुडकर, उमरोली ग्रामपंचायत सदस्य प्रचिती गायकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर उमरोली येथील सर्वेश मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून त्यांनी तालुक्यातील बहुतेक सर्व पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

सुरुवातीला जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी, ‘सध्या कोणतीही सत्ता नसताना देखील मनसेने विकासकामांचा धडाका लावला आहे. डिकसळ ते उमरोली येथील रस्त्यावर नागरिकांच्या मागणीचा विचार करत स्वयंचलित पथदिवे लावले आहेत. मात्र त्यासाठी कुणाकडून एक रुपया देखील घेतला नाही. कोरोना काळात अनेक नेते घरात दडून बसले होते. मात्र तरीही सर्वांसाठी सर्वांच्या हक्काचे कृष्णकुंज चोवीस तास उघडे होते. राज साहेबांच्या शिकवणीनुसारच आम्ही झोकून लोकांसाठी काम करतोय. कोरोना काळात महिला भगिनींना बँकवाले. खाजगी फायनान्स कंपन्या या कर्जाची रक्कम भर म्हणून तगादा लावत होत्या. टाळेबंदी असल्याने अनेकांचे रोजगार व्यवसाय बंद होते. त्यावेळी त्या माता भगिनींसाठी मनसेने रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर याबाबत धडक दिली होती. आणि फायनान्स कंपन्या, बँका यांना मोठा डंका देत महिला भगिनीना दिलासा मिळाला होता.

याच कोरोना काळात रात्रंदिवस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पत्रकारांचा देखील सन्मान व्हायला हवा यादृष्टीने आम्ही आज पत्रकारांचा देखील सन्मान केला. मनसेच्या माध्यमातून लवकरच तालुक्यात एक अद्यावत रुग्णवाहिका आणून त्यात डॉक्टर अद्यावत उपकरण अशी नागरिकांसाठो मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा मानस असून तो देखील लवकरच पूर्ण करू. तर ज्या प्रमाणे घाटात गाडी सुरळीत चालण्यासाठी डबल इंजिन लावले जाते. तसेच आम्हाला आमदार राजू पाटील यांचा बॅकअप आहे. तेव्हा मनसेची हि घौडदौड आणखी वेगाने होईल हे निश्चित आहे ‘मला सहकाऱ्यांची साथ आहे म्हणून मी काम करू शकतो.’ असा विश्वास व्यक्त केला. जे. टी. पाटील आणि साचिन कर्णूक यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेखर परदेशी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.