लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी बडतर्फ करा : स्थानिक नागरिकांची मागणी
सिटी बेल | संजय कदम | पनवेल |
घरपट्टी व अॅसेसमेंट उतारे देण्यासाठी 95 हजारांची लाच घेणार्या ग्रामसेवकासह एका कर्मचार्याला नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने अटक केली असल्याचे प्रकार नुकतेच घडले आहे. मात्र वडघर ग्रामपंचायतीची मुदत संपली असल्याने त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्राशासकाची नियुक्ती असताना देखील असे लाच प्रकरण घडते म्हणजेच ग्रामपंचायतीवर नेमणूक केलेल्या प्रशासकाचे कोणतेही नियंत्रण नाही, त्यामुळे येथील प्रशासक अधिकाऱ्याची बदली करून दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांचे आरक्षणाची मुदत पाच वर्षांचा कार्यकाळ असतो, मात्र ती मुदत संपल्यानंतर जर प्रशासकाची नियुक्ती करायची असेल तर ती नियुक्ती करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीचे मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासक म्हणून ग्रामीण आरोग्य विभागातील प्रदीप अण्णा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून डी.यु.देवरे हे काम पाहात होते. मात्र नुकतेच एका घरमालकाला घरपट्टी आणि अॅसेसमेंटचे उतारे पाहीजे होते. यासाठी त्यांनी वडघर ग्रामपंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी दगडू देवरे यांच्याशी संपर्क केला असता त्याने 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. 95 हजारावर तडजोड झाली. ठरल्यानुसार सोमवार, 21 जुन रोजी दुपारी पनवेल एसटी स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर ब्रिजा गाडीमध्ये तक्रारदाराकडून 95 हजाराची लाच स्विकारताना देवरे आणि दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश डाकी या दोघांना अॅन्टी करप्शन पथकाने ताब्यात घेतले आहे.
मात्र वडघर ग्रामपंचायतीमध्ये असे लाच प्रकरण होत असताना याच ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासक अधिकारी कांबळे यांचे कोणतेही नियंत्रण या ग्रामपंचायतीवर नाही. त्यामुळे या वडघर ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्यात आलेल्या प्रशासक अधिकारी यांची या ग्रामपंचायतीवरील नियुक्ती रद्द करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करा व या वडघर ग्रामपंचायतीवर दुसऱ्या नवीन प्रशासक अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या प्रकरणाबाबत काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी बडतर्फ करा
वडघर ग्रामपंचायतीमधील लाचखोर ग्रामविकास अधिकारी ग्रामविकास अधिकारी दगडू देवरे व दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश डाकी यांना लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. वडघर ग्रामपंचायत हद्दीतीतील चिंचपाडा, वडघर, आदिवासी वाडी, कोपर वरची टाकी, शील हि गावे या ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत. त्यामुळे या गावांची बदनामी होण्यासारखे काम यांनी केले आहे. तसेच ग्रामपंचायतीची देखील नाव खराब झाले असल्याने या लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी चिंचपाडा ग्रामस्थ पंचकमिटी बैठकीत घेणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी यांची याबाबत लवकरच भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.








Be First to Comment