सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
तरशेत ता.पेण येथील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प .उमाजी महाराज खाडे यांचे बुधवार दिनांक २३ जून रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. रायगड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक टिळक खाडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत ह.भ.प.उमाजी महाराज खाडे यांनी प्रवचनाच्या व विविध धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून गेली ५० वर्षे सामाजिक प्रबोधनाचे काम केले आहे. शिहू – बेणसे परिसरात वारकरी संप्रदायाच्या बीजारोपणाचे काम त्यांनी ऐंशीच्या दशकात केले. श्रावण महिन्यातील ग्रंथवाचनाची परंपरा त्यांनी अखंडपणे चालू ठेवली . ज्ञानेश्वरी , गाथा , भागवत , दासबोध यांसारखे अनेक धर्मग्रंथ त्यांना मुखोद्गत होते. प्रेमळ व नम्र स्वभावामुळे ते सर्वांचे आवडते होते. धार्मिक कार्याबरोबरच त्यांना सामाजिक कार्याचीही आवड होती. १९८४ ते १९८९ या काळात मुंढाणी ग्रामपंचायतीवर त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली होती. १९८९ च्या महापूरातील तरशेत , मुंढाणी व जांभूळटेप आदी गावांतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करुन त्यांनी मार्गी लावला होता.
त्यांच्या निधनाबद्दल अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा दशक्रिया विधी शिवशंभो देवस्थान शिहू येथे दिनांक २ जुलै २०२१ रोजी तर उत्तरकार्य त्यांच्या राहत्या घरी तरशेत येथे दिनांक ४ जुलै रोजी आयोजित केल्याचे खाडे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.








Be First to Comment