Press "Enter" to skip to content

मनमानसी

मनमानसी भाग क्रमांक ८ *सोबत..*

या भूतलावर सर्व प्रकारचे प्राणी..काही स्वतंत्रपणे तर काही आप आपल्या समुहासोबत राहतात. मग तो मनुष्यप्राणी असो किंवा किटक, वा हिस्र प्राणी हे एकमेकांच्या सोबतीने जीवन व्यतीत करतात.
जसे आईच्या उदरात ९ महिने सुरक्षित राहून जेव्हा बाळाचा जन्म होतो,तेव्हापासून त्याला असुरक्षित वाटायला लागतं.पण हळूहळू बाळ मोठे होत जाते..त्याच्या सोबतीला अवतीभवती कोडकौतुक करणारे असतातच..सगळ्यात जास्त सुरक्षित जागा म्हणजे आईची कुशी..प्रेमाची,मायेची उब मिळते म्हणून त्या बाळाला एकदम सुरक्षित वाटते..सतत आईच्या पदराचे टोक धरुनच तो झोपी जातो..उठल्यानंतर त्याला आई नजरेसमोर पाहिजे असते..ती नजरेपार झाली कि हा रडून सगळे घर डोक्यावर घेतो.त्याला कितीही खेळवा, त्याच्या समोर नाचा, गा किंवा प्राण्यांचे आवाज काढा..तो मात्र काही केल्या थांबत नाही.. आणि आई दिसली रे दिसली कि, बटण दाबल्यासारखे एकदम गप्प..! कारण तिच्या उदरात असल्यापासून तिच्या सहवासाचा, सोबतीचा हा परिणाम..!
असेच बाबांच्या बाबतीतही होते.घरात भले कितीही गर्दी असली तरीही ते तान्हूल बाळं बरोबर आपल्या बाबांना ओळखतं..हात पुढे केला कि लगेच त्यांच्याकडे झेप घेतो..!
कारण जन्मतःच नाळ त्यांच्याशी जोडलेली असते.त्यामुळेच नातं आणखी घट्ट होतं.
पण कालांतराने मुले मोठी होत..यशाची शिखरे पार करायला लागतात..तेव्हा मात्र आईबाबांना त्यांना थांबवणे खुप कठीण जाते..!कारण त्यांच्या सोबतीची सवय झाली तरीही मुलांची प्रगती पण तेवढीच महत्वाची असते. किंबहूना त्यांच्या पंखात बळ देण्याचे काम शेवटी आईबाबांनाच करायचे असते.
माझ्या बघण्यात आलेल्या अनेक जेष्ठ मंडळीपैकी काहींची मुले परदेशी गेल्यानंतर कायम तिकडचेच होतात…रिटायर्ड झाल्यानंतर जेष्ठांना वेळच वेळ असतो. कशाचीही कमी नसली तरीही सोबत मात्र आपल्या कुणाचीच नसते. आता हेच बघा ना..! आमच्या शेजारी आजी आजोबा एकटेच रहात होते. सुरुवातीला आमची फक्त तोंड ओळख होती. पण जसजसा परिचय वाढत गेला..तसतसे मदतीच्या निमित्ताने जाणे येणे वाढले.. एकदिवस मी ढोकळे केले होते, आणि आजी आजोबांना आवडतील म्हणून नेवून दिले..नेहेमीप्रमाणे जरा वेळ गप्पा मारत बसले. आजोबा पहाटे लवकर उठत असल्यामुळे आंघोळ, पुजा पोथी आटपून जेवणाची वाटच बघत होते.मी घरी जायला निघाले कि, तेवढ्यात स्वयंपाक घराच्या खिडकीतून कावळा काव काव करत मध्ये डोकावून पहात होता. जेवायला द्या ना लवकर ..असे जणू आवाज देवून सांगत असावा. मला प्रश्न पडला कि, हे काय नवीन..! पण मग माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून आजी म्हणाल्या अगं आमचा रोजचा कार्यक्रम आहे हा..!घड्याळाशी काहीही संबंध नसलेला हा कावळा, न चुकता दररोज या वेळेत येवून काव काव करत खिडकीत बसतो.. त्याला मी मस्त साजूक तुप लावलेली मऊसुत पोळीचे तुकडे खोल भांड्यात ठेवते. तो मस्त जेवला की, मगच आम्ही जेवायला सुरुवात करतो..आम्हाला त्याच्या सोबतीची खुप सवय झाली आहे, असे सांगत असतांनाच आजींच्या डोळ्यात पाणी तरळले..माणसांपेक्षा पक्षी प्राणी बरे गं, जीव लावला कि सोबत कधीच सोडत नाहीत.ते ऐकून मन सुन्न झाले.
माणूस वयाच्या साठी पर्यंत कष्ट करतो, पण आयुष्यात रितेपणा आला कि, त्यांना सोबतीची खरी गरज असते, त्यावेळी मुले करिअरच्या निमित्ताने बाहेर पडतात.तेव्हा मात्र जेष्ठांच्या सोबतीला पक्षी, प्राणी, पुस्तके, टेलिव्हिजन व पेपर वाचणं करणं , आयुष्यात हेच अंगवळणी पडतं.
त्यामुळेच आजकालच्या जमान्यात मुक्या प्राण्यांची सोबत अनेक जण जास्तच पसंत करतात. अगदी त्यांचे खाणे, पिणे, कपडे..चक्क त्यांच्या आवडीनिवडी पण जपल्या जातात.अहो एवढेच नाही..त्या मुक्या प्राण्यांचा वाढदिवस पण साजरा करतात. तोही त्यांच्या आवडीचा केक आणून..! कारण सोबतीचा परिणाम आणि त्या प्राण्यांना वाचा नसल्याने राग, रुसवा , हेवेदावे करण्याचा प्रश्नच येत नाही.ना त्यांना कोणत्या प्रकारचा अहंकार असतो..म्हणूनच त्याची सोबत कायमच हवीहवीशी वाटते.
म्हणुनच नातं हे पावसासारखं कधीच नसावं..म्हणजे गरजलं..बरसलं..भिजवलं आणि निघून गेलं..तर नात हवेसारखं असावं..गडबड नाही, गोंधळ नाही.. नेहमी शांत पण कायम सोबत करणारं..!!

सौ. मानसी मंगेश जोशी
खांदा कॉलनी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.