नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे च नाव देणार : शेकाप नेते राजेंद्र पाटील उतरले मैदानात
सिटी बेल | वहाळ |
सिडको आस्थापना च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचे द्यावे ? याचा वाद सध्या भलताच चिघळला आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देणार या भूमिकेवर ठाम आहेत. कुठला राजकीय पक्ष काय भूमिका घेतो ? याकडे जराही लक्ष न देता केवळ प्रकल्पग्रस्त बांधवांची अस्मिता आणि दैवत असणारे दि बा पाटील यांच्या नावासाठी आपापल्या पक्षाच्या भूमिका खुंटीला टांगून भूमिपुत्र या आंदोलनामध्ये उतरले आहेत.
२४ जून रोजी दी बा पाटील यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र बांधव सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी वहाळ येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रविवार दिनांक 20 जून रोजी "जनतेचा आवाज" या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. वहाळ, बामण डोंगरी, मोरावे, जावळे गणेशपुरी आणि उलवे नोड येथील नागरीक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाने सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला दुजोरा दिला असला तरी देखील दि बा पाटील साहेबांचा सच्चा समर्थक या नात्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील या आंदोलनात उतरले आहेत.
यावेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना राजेंद्र पाटील म्हणाले की. माजी खासदार लोकनेते दि बा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत, भूमिपुत्रांचे कैवारी आहेत,आमचे उद्धार कर्ते आहेत.त्यांचे नाव प्रकल्पग्रस्तांच्या अंतःकरणात कोरले आहे. या आंदोलनात कोणीही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी होत नाहीये तर दि बा पाटील साहेबांचे निस्सीम चाहते या भूमिकेतून प्रत्येक जण आंदोलनात उतरत आहे.येत्या २४ जूनला प्रशासनाने कितीही विरोध केला तरी मोठ्या संख्येने आंदोलनात आम्ही उतरणार आहोत.ज्या दीबांनी आपल्यासाठी रक्त सांडले,त्यांचे नाव देण्यासाठी आपण दोन तास काढलेच पाहिजेत. यावेळी उलवे नोड मधील अनेक सेवाभावी संघटनांनी राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
मो का मढवी गुरुजी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, मयुर भोईर, रमेश दापोलकर,अमित मुंगाजी, जगदीश पारींगे
,गजानन शिरढोण कर,सीताराम शेठ नाईक,प्रमोद कडू,प्रितम नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज हा मोर्चा काढण्यासाठी प्रशासन आम्हाला परवानगी देत नाही. माजी खासदार लोकनेते दि बा पाटील हे आमची अस्मिता आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात,आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे ही अस्मिता घेऊन आपण लढलो होतो. त्यावेळी मोर्चे आंदोलने यासाठी ब्रिटिश सरकारची कधी कुणी परवानगी मागितली होती काय ? सुनील म्हात्रे
माजी सरपंच
हा मोर्चा प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या अस्मितेचा आहे त्यामुळे या मोर्चात आम्ही सगळेजण भाजी भाकरी ची शिदोरी आणि स्वतःचे पाणी सोबत घेऊन आंदोलनात उतरणार आहोत असे प्रकल्पग्रस्त बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.
Be First to Comment