|| श्रीगुरवे नमः ||
विचारधारा *पेच*
पेचातील शब्द
म्हणजे गूढ तारे
बुद्धीस चालना देऊनी
मग उकलती सारे
जीवन एक पेच
कुणा न कधी उलगडे
जगता जीवन असे
हमखास कचाट्यात सापडे
खेळले असे डावपेच
भेदभाव करुनी नित्य
तरीही विश्वास माझा
जिंकेलच नेहमी सत्य
कर्माचा सिद्धांत
जीवनातील पेच
जाणले सर्वकाही मी
न लागता ठेच
उलगडता सर्व पेच
अन् सर्व रहस्य-राज
रोजनिशीप्रमाणे सुरु
होईल कामकाज
ज्याचा हा डावपेच
भरतील दिवस त्याचेही
न्यायाच्या दरबारात
बसतील शिक्षेचे कडेही
म्हणून खेळू नये कधी
कोणाशी असे डावपेच
रात्र वैऱ्याची असे जाणुनी
होईल मग खेचाखेच
पेच म्हणजे कोडे, कठीण परिस्थिती. माणसाचे जीवन म्हणजे हा एक प्रकारचा कधी न उलगडणारा पेच आहे. कारण यात पुढे काय घडणार आहे किंवा आधीच्या कृत्यांचा हिशोब काय? असे सर्व आपल्याला माहीत नसते.
अशा या पेचात आणखीन डावपेच दुसर्यांकडून आपल्यासाठी घडवले जातात; जे कधी हितकारक तर कधी नुकसानदायी ठरतात.
भेदभाव, फसवणूक, मानहानी वगैरे असे कितीही कोणीही वाईट डावपेच खेळले तरीही नेहमी सत्यच जिंकते व अशा असत्य कृत्यांना शिक्षाही होतेच.
अशा पेचातील प्रसंगांमध्ये आपल्या सत्कर्माची पुण्याईच आपणांस वाचवते. म्हणून कितीही पेच-प्रसंग आले तरी मानवाने सकारात्मकतेनेच वागून सत्कर्म करावे. शेवटी त्या पुण्याईची गणना होऊन आपणास चांगली मुक्ती मिळते.
जैसा आलो तैसेची निघालो;
मातीतून जन्मुनी मातीतच मिसळलो…
अशीच सर्वांची अवस्था असते. तेव्हा कशात किती गुंतावे? डावपेच मांडून दुसर्यास त्रास देऊन किती लुबाडावे? यावर नक्की विचार करावा.
या कलियुगात प्रत्येक रात्र ही वैऱ्याची आहे. कधी कोणाची मति फिरून कोण कसा वागेल? हे माहीत नाही.
म्हणून उगाच वादविवादात, भांडण-तंटा यात वेळ वाया न घालवता अशावेळी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे तत्त्व बाळगावे म्हणजे अशा या पेचातील प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य लाभते.
——लेखिका——
✍️ श्वेता जोशी, नवीन पनवेल
Be First to Comment