Press "Enter" to skip to content

कामोठे वासियांच्या समस्या निवारण्यासाठी नगरसेवक विकास घरत आक्रमक

अधिकाऱ्यांना धारेवर धरताच कामे लागली मार्गी

सिटी बेल | कामोठे |

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.येथील सांड पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओथंबून वहात आहेत.याची तक्रार करून सुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले. रहिवाशांच्या सह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेताच कामे मार्गी लागली आहेत.

त्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक विकास घरत म्हणाले की, सांड पाण्याच्या टाक्या सेक्टर 34 परिसरात वाहत असल्याने अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. त्यावर घोंगावणार्‍या माशा आणि 24 तास वाहणारे सांडपाणी यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.हेच पाणी पिण्याच्या पाण्यात देखील मिसळते त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.याशिवाय येथील चेंबर वरची झाकणे नाहीशी झाली आहेत,पदपथ अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा सगळ्या समस्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून, आम्ही पाठपुरावा करून देखील कामे होत नसतील तर मला रुद्रावतार धारण करावा लागेल. आज येथील समस्याग्रस्त नागरिकांना घेऊन मी कामोठे सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यकारी अभियंता विलास बनकर यांची भेट घेतली.आठ दिवसात नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू होईल.तोपर्यंत जेट मशीन,आणि सक्शन मशीन द्वारे टाक्या साफ केल्या जातील.

भर रस्त्यावर ड्रेनेज मधुन मलमुत्र बाहेर येत असताना दिसत आहे

घरत पुढे म्हणाले की, खरे तर या समस्या आणि या व्यतिरिक्त अन्य भेडसावणारे प्रश्न यासाठी आम्ही सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसापूर्वी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. परंतु अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीतून जर प्रश्न सुटणार नसतील तर आम्हाला आक्रमक व्हावे लागेल.ठेकेदार जर कामे करत नसतील तर त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याची जबाबदारी सिडको अधिकाऱ्यांची आहे. परंतु बहुतांश वेळेला जर समस्या निर्माण झाल्या तर ठेकेदार यांच्यासोबत नागरिक आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांचे वाद होत असतात.

कार्यकारी अभियंता बनकर यांनी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे बाबत प्रशासकीय मंजुरी आलेली असून आठ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल असे आश्वासन दिले. तसेच मेनहोल वरती फ्रेम व झाकण बसवण्याचे काम तातडीने सुरू होईल असे देखील सांगितले. यावेळी नगरसेवक विकास घरत यांच्यासमवेत नगरसेवक डॉक्टर अरुण भगत व सेक्टर 34 मधील रहिवासी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.