Press "Enter" to skip to content

फेसबुकच्या अन्याय्य वर्तनाचा देशभरातील हिंदू बांधवांकडून आंदोलनाद्वारे तीव्र निषेध !

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या फेसबुक पेजवरील बंदी उठवण्याची मागणी !

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

गेल्या काही काळात फेसबुकने देशभरातील हिंदुत्वनिष्ठ मान्यवर आणि संघटना यांची पृष्ठे कोणतेही कारण न देता बंद केली आहेत. ही मनमानी कारवाई संताप जनक असून हिंदु बांधवांमध्ये त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे. शनिवारी याचे तीव्र पडसाद अन्य सामाजिक माध्यमातून उमटले. हिंदुत्वनिष्ठ मान्यवर आणि संघटना यांच्या पृष्ठावर लादण्यात आलेली बंदी त्वरित उठवण्यात यावी, अशी आग्रही मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.

फेसबूक भारतातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते, संघटना, मिडिया, नेते यांच्यावर पक्षपाती कारवाई करत असून, त्यांच्या पोस्ट डिलीट करणे, त्यांच्या फॉलोअर्स संख्या कमी करणे, त्यांना वारंवार नोटीस पाठवून मतस्वातंत्र्यावर बंधन घालणे, अशा प्रकारे मनमानी कारभार करत आहे.

फेसबुकने कोणतेही कारण न देता हिंदु जनजागृती समितीचे पेज facebook.com/HinduAdhiveshan, यांसह जिल्हा आणि राज्यस्तरीय एकूण 35 पेज बंद केली आहेत. त्याचबरोबर सनातन प्रभात नियतकालिकाचे पेज facebook.com/sanatanprabhat, सनातन शॉपचे पेज facebook.com/sanatanshop या पानांवरही बंदी आणली आहे. त्याचप्रमाणे सुदर्शन टीव्ही, भाजपचे तेलंगणा येथील आमदार श्री. टी. राजासिंग यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या फेसबूक पेजेसवर बंदी आणली आहे. कोणतेही कारण वा सूचना न देता ही कारवाई करण्यात आली आहे.

खरे तर कोणताही मजकूर अथवा साहित्य यांविषयी आक्षेप असेल, तर तसे फेसबूकने कळवायला हवे; मात्र तसे काहीच कळवलेले नाही. दुसरीकडे जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून प्रक्षोभक भाषणे करणारा आणि आतंकवादी कारवायांमुळे भारत सरकारने बंदी घातलेला ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा डॉ. झाकीर नाईक यांचे, देशविघातक कार्यात गुंतलेली ‘पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया’चे फेसबूक खाते चालू आहे.

या अन्याय्य कृती विरोधात देशभरातील हिंदू बांधवांनी शनिवारी विविध माध्यमातून फेसबुकचा निषेध नोंदवला. ट्विटरवर या संदर्भात #Facebook_Suppress_Hindu_Voices हा ट्रेंड चालविण्यात आला. अनेक हिंदू बांधवांसह मान्यवरांनी फेसबुकच्या अन्याय कार्यवाही विरोधातील या ऑनलाईन मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. संबंधित शासकीय यंत्रणा आणि मंत्री यांनाही हिंदू संघटनाचे होणारे दमन रोखण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशा आशयाच्या निवेदनाचे मेल पाठविण्यात आले. देशभारतील विविध राज्ये, जिल्हे यातून ही मोहीम चालू असून जोपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या फेसबुक पेजवरील बंदी उठेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.