सिटी बेल । पनवेल ।
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सहचिटणीस नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी लोकाभिमुख कार्यक्रमांतून आपला जन्मदिन साजरा केला. कोरोना विषाणू च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करत असताना अभिष्टचिंतनाचे सोहळे करणे इष्ट होणार नाही या भूमिकेतून त्यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले.
जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी कामोठे येथील सेक्टर 8 याठिकाणी स्वच्छता अभियान राबवून सारा परिसर कचरा मुक्त केला. यानंतर पनवेलच्या पोदी विभागामध्ये सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माध्यमातून गरजू रिक्षाचालकांना शंकर शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वाटपासाठी सिद्धिविनायक सोशल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू यांनी पुढाकार घेतला.
जन्मदिनाच्या दोन दिवस अगोदर शंकर शेठ म्हात्रे यांनी पारनेर येथे जाऊन आमदार निलेश लंके यांच्या भव्य दिव्य अशा कोव्हीड सेंटरला आर्थिक मदत केली होती. आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शंकरशेठ म्हात्रे म्हणाले की समाजोपयोगी कामांतून आपला जन्मदिवस साजरा करणे ही तर शेतकरी कामगार पक्षाची शिकवण आहे. तशातच कोरोना महामारी ने पुन्हा डोके वरती काढल्यानंतर ऑक्सिजन आणि ऑंटी व्हायरल इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला होता. अशा परिस्थितीत गर्दी जमविणे म्हणजे विषाणूला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत साधेपणाने व कोरोना प्रतिबंधक सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून समाजोपयोगी कामातून वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. आमदार निलेश लंके यांचे हिमालया इतके मोठे कार्य जवळून पहायला मिळाले याचे समाधान देखील आहेच. त्यांच्या या भागीरथ प्रयत्नांच्यात माझा खारीचा वाटा देण्याचा मी प्रयत्न केला.



तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शंकरशेठ म्हात्रे यांचे अभीष्टचिंतन केले.








Be First to Comment