Press "Enter" to skip to content

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे उपक्रम

ऋतुस्रावामध्ये पर्यावरणपूरक साधनांच्या वापराबाबत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुक्त संवादाचे आयोजन

सिटी बेल । आरोग्य प्रतिनिधी ।

२८ मे  रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक मेन्स्ट्रुअल दिनानिमित्त नवी मुंबई नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे नुकताच  ऋतुस्रावामध्ये  पर्यावरण पूरक साधनांचा वापर कसा करता येईल याबाबत हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मुक्त संवाद आयोजित केला होता.

हा मुक्त संवाद तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ दीपा काला यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आला होता व यामध्ये मेडिकल व नॉन मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. आपल्याकडे मुळातच ऋतुस्राव  हा विषय चारचौघातच काय, अगदी चार बायकांतही काढला जात नाही त्यामुळे आजही मेन्स्ट्रुअल कपसारखे पर्याय आजही दुर्लक्षित आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना जेष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ दीपा काला सांगतात ” पाळी म्हटली की मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा नाना गोष्टींनी महिला त्रस्त असतात. त्यातच कपडय़ामुळे ओलेपणा, डाग पडण्याची काळजी यामुळे महिलांना आजारी असल्यासारखे  वाटते , अशावेळी मेन्स्ट्रुअल कपासारखे पर्याय मुख्यतः नोकरी करणाऱ्या महिलांना सोईस्कर पडतील व अशाच विविध पर्यायांबाबत आम्ही या मुक्त संवादात चर्चा केली. यावेळी अनेक महिलांनी आपले प्रश्न व ऋतुस्रावामध्ये येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. भारतामध्ये हे सर्व नवीन असले तरी कपाची कल्पना शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे. १९८० मध्ये रबराचा ‘द कीपर’ कप आला तो अजूनही मिळतो. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला मेडिकल दर्जाच्या ‘सिलिकोन’पासून बनवलेले अत्यानुधिक कप बाजारात विक्रीसाठी आले होते.”

भारतामध्ये शहरीकरण वाढत आहे व त्यामुळे ऋतुस्रावामध्ये सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये पाच करोडहून अधिक महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करीत आहेत व संख्या दर महिन्याला वाढत जाणार आहे त्यामुळे हे वापरून  फेकून देत असलेल्या या नॅपकिन्सच्या संख्येचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे, पर्यावरणावर त्याचा किती विपरीत परिणाम होणार आहे याचाही कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे कारण कुठलेही नॅपकिन्स पूर्णपणे नष्ट व्हायला शेकडो वर्षे जावी लागतात अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ दीपा काला यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.