कोपरखैरणे येथील
‘सीटी स्कॅन सेंटर’ने 5 जणांची अतिरिक्त आकारलेली रक्कम केली परत !
सिटी बेल । नवी मुंबई । विश्वास निकम ।
महाराष्ट्र शासनाने कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार आणि तपासणी यांसाठी दर निश्चित केले आहेत. असे असतांनाही ‘कुलकर्णी निदान डायग्नोस्टिक सेंटर’ने महाराष्ट्र शासनाचे नियम डावलून कोपरखैरणे येथील जयदीप शेडगे आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य असे एकूण 5 जणांची ‘सीटी स्कॅन’च्या नावाखाली प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे 7,500 रुपये जास्त रक्कम आकारली. याविषयी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने संबंधित ‘डायग्नोस्टिक सेंटर’कडे पत्रव्यवहार करून योग्य कारवाई करण्यास सांगितले असता त्यांनी आकारलेली अधिकची रक्कम शेडगे कुटुंबियांना परत केली आहे.
शेडगे यांनी ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांच्या ‘सुराज्य की ओर’ या ऑनलाईन कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असल्याचे म्हटले आहे अशी माहिती डॉ. मनोज सोलंकी,
समन्वयक,आरोग्य साहाय्य समिती यांनी दिली.
या विषयी दिलेल्या माहितीत कोपरखैरणे येथील शेडगे कुटुंबातील एकूण 5 जण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांच्या सीटी स्कॅन अहवालामध्ये ते कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट दिसत होते; म्हणजेच त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचेही स्पष्ट दिसत होते. तरीही त्यांच्याकडून प्रत्येकी 2,500 रुपयांच्या ऐवजी 4,000 रुपये आकारण्यात आले. म्हणजे प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे 5 जणांचे एकूण 7,500 रुपये अतिरिक्त घेण्यात आले. शेडगे यांनी ‘आरोग्य साहाय्य समिती’ कडे यासंदर्भात साहाय्य मागितले असता समितीने त्यांना महाराष्ट्र शासनाच्या 24 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा दाखला देऊन कोरोना रुग्णाच्या सीटी स्कॅनसाठी 2,500 रुपये घेण्याचा नियम असल्याचे सांगितले. समितीने केलेल्या मार्गदर्शनानुसार शेडगे यांनी ‘कुलकर्णी निदान डायग्नोस्टिक सेंटर’कडेे याविषयी तक्रार केली. व शेडगे यांनी तक्रार करतांना डॉक्टरांचे तपासणीसाठीचे पत्र, त्यांचे देयक, तपासणी अहवाल आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय इत्यादी सर्व कागदपत्रे जोडली.
या तक्रारीत ‘डायग्नोस्टिक सेंटर’ने दोन दिवसांत निर्णय घेऊन अतिरिक्त रक्कम परत करावी, अशी मागणी केली.आणि ‘आरोग्य साहाय्य समिती’ने या डायग्नोस्टिक सेंटरला सर्व कागदपपत्रे पाठवून शेडगे यांच्या तक्रारी संदर्भात तातडीने दखल घेण्यास सूचित केले. त्यानुसार ‘डायग्नोस्टिक सेंटर’ने शेडगे व त्यांच्या कुटूंबातील एकूण 7,500 रुपये परत केले असल्याचे डॉ मनोज सोलंकी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कोरोना रुग्णांच्या छातीचा सीटी स्कॅन केल्यावर 2,500 रुपये एवढे शुल्क आकारणे बंधनकारक आहे. असे असतांनाही सीटी स्कॅनची अतिरिक्त दराने आकारणी करून अनेक सामान्य रुग्णांची फसवणूक केली जात आहे. तरी छातीची सीटी स्कॅन तपासणी करतांना आणि कोरोनाचे अन्य उपचार घेतांना शासन निर्णयानुसार देयक आकारले जात असल्याची खात्री करावी, असे आवाहन शेवटी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने सर्व नागरिकांना केले आहे.







Be First to Comment