Press "Enter" to skip to content

सिटी बेल विशेष : विमानतळाला नाव कुणाचे ? बाळासाहेबांचे कि दि बां चे !

शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय्य हक्क मिळवून देणारे दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे : प म पा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे

सिटी बेल । पनवेल ।

नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचे, दि बा पाटीलांचे ? की हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ? हा वाद सध्या चिघळतोय. माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यायचे असा चंग बांधून सर्वपक्षीय कृती समिती आंदोलन पेटवत आहे. १० जून रोजी मानवी साखळी निर्माण करून राज्य शासनाला झोपेतून जाग करण्यासाठी एल्गार केला जाणार आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर २४ जून रोजी सिडकोच्या मुख्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली असता नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते म्हणाले की, नवी मुंबई क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभारण्याची प्रक्रिया तशी दशकभरापूर्वी सुरू झाली, प्रत्यक्ष भूसंपादन सहा वर्षांपूर्वी सुरू झाले. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनामध्ये या विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले जावे अशी भावना होती.

अबालवृद्धांपासून प्रत्येकाला तसे वाटत होते. आमचा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही. किंबहुना आज जर ते हयात असते तर त्यांनी देखील नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी भूमिका घेतली असती. आज ठाणे,नवी मुंबई,रायगड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको आस्थापनाने संपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना आणि प्रकल्पग्रस्तांना त्याचा योग्य मोबदला मिळवून देण्याचे अतुलनीय कार्य लोकनेते दि बा पाटील साहेब यांनी केले आहे. त्यांच्यामुळेच १२.५% विकसित भूखंड परतावा देण्याचे तत्व मंजूर झाले.

शेतकरी मजूर कष्टकरी कामगार अशा श्रमजिवी घटकाला देखील सक्षम बनविण्यासाठी डी बा पाटील यांनी केलेले कार्य अफाट आहे. त्यामुळे दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला देणे योग्य होईल.

शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महाविकासआघाडी मधील नगरसेवक येणाऱ्या महासभेमध्ये नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिले पाहिजे असा प्रस्ताव ठेवणार आहेत. दि बा पाटील साहेबांनी उदरनिर्वाहाचे साधन गमावलेल्या शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी संघर्ष केला,त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतली म्हणूनच साडेबारा टक्के परतावा चे तत्व कायद्यात रूपांतरित होऊन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

दि बां च्या लढ्याची खुण आजही माझ्या वडीलांच्या (जे एम म्हात्रे) पाठीवर 

मला संघर्षाचे बाळकडू आमच्या घरातूनच मिळाले आहे.
जासईच्या लढ्यामध्ये माझे वडील जे एम म्हात्रे यांनी आंदोलनात आघाडीवर राहून पोलिसांच्या लाठ्या अंगावर झेलल्या आहेत. त्याचे व्रण आजही त्यांच्या पाठीवर दिसून येतात. त्यांनी आम्हाला हे व्रण स्वतःहून दाखवले आहेत. पाठीवरील ते व्रण बघितल्यानंतर आमचा उर अभिमानाने भरून येतो. दि बा पाटील साहेबांच्या सोबत कित्येक आंदोलनात त्यांनी साथ दिलेली आहे. त्यांच्या शिकवणीनुसार आणि पक्षाच्या विचारधारे नुसार आम्ही आज कार्य करत आहोत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.