राज्य शासनाने जनभावनेचा आदर करून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे : भाजपा नेते समीर केणी
- सिडकोच्या वतीने विकसित करण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादामुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. परंतु नामांतराचा कुठलाही घोळ न घालता राज्यशासनाने येथील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर करत या विमानतळाला माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी परखड भूमिका भाजपाचे युवा नेता समीर केणी यांनी मांडली आहे.
नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची सूचना सर्वप्रथम नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली होती. त्यांच्याच सूचनेची री ओढत त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या सिडको आस्थापनाने त्या स्वरूपाचा ठराव पारित करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. परंतु या विमानतळ उभारणीमध्ये आणि सिडको अस्थापना ला आपल्या हक्काच्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये या निर्णयामुळे चांगलाच रोष दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे युवा नेता समीर केणी यांनी त्यांची परखडपणे भूमिका मांडताना राज्य शासनाने जनभावनेचा आदर करून दि बा पाटील साहेब यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे असे सूतोवाच केले. ते पुढे म्हणाले की नवी मुंबई विमानतळ उभारणीबाबत जेव्हा सर्वप्रथम सिडकोने आमच्याशी पत्रव्यवहार केला आणि आम्हाला बैठकीला पाचारण केले त्या क्षणापासून या विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे असे आमच्यातल्या प्रत्येकाला वाटत आहे. मी जी भूमिका मांडतोय ती माझी वैयक्तिक भूमिका तसेच आमच्या ग्रामस्थ मंडळाची देखील भूमिका आहे. आज प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि बा पाटील साहेबांना सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक भूमिपुत्र सन्मान देतात. आमचा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही परंतु जे कार्य दि बा पाटील साहेबांनी केले आहे त्या कार्याच्या पुढे अन्य कोणाच्याच कार्याची तुलना होऊ शकत नाही. आज येथील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधव ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा उपभोग घेत असेल तर ते केवळ आणि केवळ दि बा पाटील साहेबां मुळेच.
त्यामुळे राज्य शासनाने जनतेच्या भावनांचा आदर करत नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील साहेब यांचे नाव दिले पाहिजे.
Be First to Comment