Press "Enter" to skip to content

धाटाव MIDC मधील अंशुल स्पेशॕलिटी माॕल्युकूल ली. कंपनीमध्ये वायुगळती

कामगार दुर्घटनेबाबत बेजबाबदार कंपनी प्रशासनाला आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतले फैलावर

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

धाटाव एमआयडीसीमधील अंशुल स्पेशॕलिटी माॕल्युकूल लिमिटेड या कंपनीमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांना त्रास झाला.त्यांना डॉ.जाधव हॉस्पिटल रोहा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार अनिकेत तटकरे यांनी तत्काळ कंपनी प्रशासनाकडे संपर्क साधला.कंपनी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, म्हणून स्वतः घटनास्थळी कंपनीत भेट दिली. तेथील कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, झालेल्या दुर्घटनेबाबत कंपनी प्रशासन गंभीर दिसले नाही.

त्यानंतर आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी रोहा येथील डॉक्टर जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कामगारांची चौकशी केली.तेथे दोनच कामगार उपचार घेताना दिसले.तर तिसऱ्या कामगाराबद्दल विचारणा केली असता सदर कामगार अत्यवस्थ असल्याने त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये हलविल्याचे समजले . विशेष म्हणजे ही बाब कंपनी प्रशासनाने पूर्णपणे लपवल्याचे समजले.

आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही हि बाब सांगणारच होतो असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. खरे तर अशी दुर्घटना होऊ नये म्हणून कंपनी प्रशासनाने या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असताना कंपनी प्रशासन या बाबतीत गंभीर नसेल आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी अशा प्रकारचा खेळ होणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण कदापि सहन करणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली.

विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी याच कंपनीमध्ये अशाच प्रकारची दुर्घटना होऊन ११ कामगारांना त्रास झाला होता, यावेळी सुद्धा आमदार अनिकेत तटकरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली होती, तेंव्हाही कंपनी प्रशासनाने आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन यापुढे अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही असे स्पष्ट केले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा तशीच दुर्घटना होते आणि कंपनी प्रशासन यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असेल,तर हा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही कारण एखादी मोठी दुर्घटना घडली तर कामगारांना बरोबरच आजूबाजूच्या नागरिकांनी त्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कंपनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करणे आणि अनेक कामगार व नागरिकांचा जीव टांगणीला ठेवणे असा होतो. हे कदापि सहन केले जाणार नाही. या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या कंपनी प्रशासनावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केले. एकंदरीत आमदार अनिकेत तटकरेंनी कामगारांप्रती घेतलेल्या भुमिकेबद्दल कामगार वर्गांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.