तिसरा पंच *नवस*
एका गावात एक तरुण रहात होता.. दैनंदिन जीवनातील संकटांना कंटाळलेला.. त्याला कोणीतरी त्या मंदिराविषयी सांगितले.. दूर डोंगरावर असलेले मंदिर जिथे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात… पण जाण्याचा रस्ता अत्यंत दुर्धर… मोठे घनदाट जंगल, जोराने वाहणारी विशाल नदी, दरी खोरे त्यानंतर उंच डोंगर आणि त्यावर ते मंदिर.. संकटांना कंटाळलेल्या त्याने ते सगळे पार करायचे ठरविले..
मोठ्या निश्चयाने तो निघाला.. ठाम इच्छाशक्ती वर त्याने ते सर्व पार केले.. त्रास झाला पण ध्येय होते तिथे जाण्याचे..
तो पोचला आणि थबकला.. कारण मंदिर नव्हते तिथे… होते फक्त एक झोपडे आणि समोर होती एक म्हातारी… तो निराश हताश झाला..
त्याने तिला सांगितले.. मी दूरवरून आलो आहे त्या नवस पूर्ण करणाऱ्या देवाचे दर्शन घेण्यास..
ती हसली म्हणाली “निराश होऊ नकोस,
तो देव आहे ना, जा झोपड्यात जाऊन दर्शन घे ..”
तो मोठ्या आशेने झोपड्या च्या दिशेने पळाला… तिथे अंधार होता.. काही दिसत नव्हते..समोरच्या भिंतीवर एक फोटो होता.. त्याने हात जोडले.. आणि मनातील सगळ्या इच्छा बोलून दाखविल्या.. 🙏🏻🙏🏻.. मन समाधान पावले..
देव नीट दिसावा म्हणून त्याने काडेपेटी तील एक काडी पेटविली..
तर तिथे होता एक आरसा..
- शेखर अंबेकर, आदई
Be First to Comment