Press "Enter" to skip to content

सकल मराठा समाज पनवेल यांचा अनुकरणीय उपक्रम

करंजाडे येथे परिसराचे निर्जंतुकीकरण करून केली छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

सिटी बेल । पनवेल ।

आज दिनांक 14 मे रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षयतृतीया या शुभदिनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून आला होता.

कोरोना विषाणूची दुसरी लाट तीव्र स्वरूपात आघात करत असल्यामुळे सध्या टाळेबंदी चे निर्बंध आहेत. त्यामुळे नागरिकांना या दुग्धशर्करा योगाचे निमित्ताने आनंद लुटता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना विषाणूच्या संक्रमणाचे भान सुटता कामा नये या भूमिकेतून सकल मराठा समाज पनवेल यांच्यावतीने करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये निर्जंतुक द्रव्यांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य समन्वयक विनोद साबळे आणि करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 14 मे रोजी करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सोडियम हायपोक्लोराइड या निर्जंतुक द्रव्यांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला.

यावेळी आपली भूमिका मांडताना विनोद साबळे म्हणाले की आपले आदर्श असणाऱ्या राष्ट्रसंतांच्या जयंती अथवा पुण्यतिथी सारखे कार्यक्रम साजरे करत असताना आज समाजावर ओढवलेली परिस्थिती ही नक्कीच ध्यानात घेतली पाहिजे. म्हणूनच आज रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आम्ही ती सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी करण्याचे ठरविले. कोरोना विषाणू संक्रमणाची दुसरी लाट अधिक तीव्र स्वरूपात आपल्यावर आघात करत आहे. त्यामुळे कोरोना निर्मूलनाच्या त्रिसूत्री पैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणे या सूत्राची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरविले. आमची संकल्पना सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी त्वरित या कार्यक्रमास दुजोरा दिला. कोरोना विषाणूच्या निर्बंधांच्या निकषांचे तंतोतंत पालन करत हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्यानिमित्ताने करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील सोसायटी, रस्ते , वस्त्या याठिकाणी निर्जंतुक द्रव्य फवारले जाणार आहे ही समाधानाची बाब आहे.

याबाबत आपली प्रतिक्रिया देताना सरपंच रामेश्वर आंग्रे म्हणाले की समाजोपयोगी कामांतून राष्ट्रसंतांचे जयंती, पुण्यतिथी साजरा करण्याचा आदर्श पायंडा सकल मराठा समाज, पनवेल यांच्यावतीने घालून देण्यात येत आहे. या भूमिकेचे मी स्वागत करतो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी आमच्या ग्रामपंचायत हद्दीचे निर्जंतुकीकरण करून दिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक विनोद साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार प्रकट करतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.