Press "Enter" to skip to content

सिटी बेल विशेष : विमानतळाला नाव कुणाचे ? बाळासाहेबांचे की दि बां चे!

विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देऊ : नंदराज शेठ मुंगाजी

सिटी बेल । पनवेल ।

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले जावे ही भूमिका दिवसेंदिवस जोर धरत आहे. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांनी पराकोटीचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर अशी भूमिका घेत विमानतळाला नाव दि बा पाटील साहेबांचेच! असे अभियान सुरू केले आहे.स्थानिक प्रकल्पग्रस्त लॉरी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांनी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देऊ अशी रोखठोक भूमिका मांडली आहे.

नंदराज शेठ मुंगाजी हे काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संघर्ष समितीचे सदस्य आहेत. विघ्नहर्ता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी फार मोठे सामाजिक काम उभारले आहे. तसेच लॉरी चालक आणि मालक यांचा उत्कर्ष साधण्या करीता पाडेघर स्थानिक प्रकल्पग्रस्त वाहन चालक मालक वेल्फेअर असोसिएशन देखील त्यांनी उभारली आहे. आमच्या प्रतिनिधी समोर भूमिका मांडत असताना नंदराज मुंगाजी म्हणाले की सिडको अस्थापना ने आम्हा प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दि बा पाटील साहेब यांचे नाव नाकारल्यामुळे मी सिडको चा जाहीर निषेध करतो.

ज्या पद्धतीने दि बा पाटील साहेबांनी आम्हाला आमचे हक्क मिळवून दिले, स्थानिक भुमिपुत्रा ला सुखा समाधानाचे दिवस दाखवले त्या दि बा पाटील साहेबांशिवाय अन्य दुसऱ्या कुठल्याही नावाबाबत आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही.

मुंगाजी पुढे म्हणाले की, सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा सिडको इथे आली आणि आम्हा भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणारी जमीन त्यांनी बळकावून घेतली. त्याबदल्यात अत्यल्प मोबदला देऊन आम्हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा विचार प्रशासनाचा होता. परंतु लोकनेते दि बा पाटील साहेब एखाद्या वाघाप्रमाणे लढले. प्रशासनाला जेरीस आणून आम्हा स्थानिक भूमिपुत्रांचा उत्कर्ष करणारी साडेबारा टक्के परताव्याची स्कीम मंजूर करून घेतली. यासाठी अनेक आंदोलने करावी लागली, मोर्चे काढावे लागले, 1984 च्या आंदोलनात प्रकल्पग्रस्त बांधवांचे जीव देखील गमावले.

त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेब यांचेच नाव दिले पाहिजे. आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना न्याईक हक्क मिळवून देण्यासाठी दि बा पाटील साहेब अखेरच्या श्वासापर्यंत लढत होते. त्यामुळे त्यांचे नाव देण्यासाठी आम्ही आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करू. सिडको आस्थापनाला अन्य दुसरे नाव देण्याचा प्रस्ताव मागे घ्यायला लावून त्यासाठी गरज पडल्यास सगळे प्रकल्पग्रस्त बांधव एकत्र येऊ आणि विमानतळाचे काम बंद पडावे लागले तर आमची तीदेखील तयारी आहे.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव दिले पाहिजे. कालपर्यंत आमचे हक्क मिळवताना आमच्यातले बांधव शहीद होत होते. पण जर विमानतळाला दि बा पाटील साहेब यांचे नाव दिले नाही तर आता प्रशासनातील अधिकाऱ्यांना हुतात्मा बनवण्याची तयारी देखील आम्ही ठेवली आहे.

विकास जनार्दन म्हात्रे

सचिव

स्थानिक प्रकल्पग्रस्त लॉरी चालक-मालक संघटना

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.