Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये आदर्श विवाह सोहळा

निवृत्त मुख्यधिकाऱ्यांनी केला फक्त अकरा जणांच्या उपस्थितीत कन्येचा विवाह

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेत दोन टर्म मुख्याधिकारीपदी असलेले, सेवानिवृत्त झालेले दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. आपल्या समारंभामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये हाच त्यामागचा त्यांचा हेतू होता.

शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्याचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाच्या भीतीने हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये विवाह सोहळे उरकले गेले. त्यांनतर मध्यंतरी विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थिती असावी असा आदेश होता, मात्र तो आदेश बासनात गुंडाळून विवाह सोहळ्याला दहापट म्हणजे 500 ते 600 लोकांची गर्दी अनेक ठिकाणी होत असल्याचे दिसते. हे झाले विवाह सोहळ्याचे त्यापूर्वी होणाऱ्या साखरपुडा किंवा हळदी समारंभालाही ‘लक्षणीय’ गर्दी होत होती आणि या फालतू प्रतिष्ठेमुळेच अनेक गावागावात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामध्ये काहींना जगाचा निरोप घ्यावा लागला.

कर्जत नगरपरिषदेत दोन वेळा मुख्याधिकारी म्हणून काम केलेले सेवानिवृत्त झालेले दादाराव अटकोरे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मालेगावचे त्यांनी आपली कन्या डॉ. ऋतुजा हीचा विवाह थाटामाटात करण्याचा विचार होता कारण त्यांच्या कुटूंबातील हे पहिलेच लग्न होते. मात्र गेल्या वर्ष – सव्वा वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आले आणि सर्वच समारंभांवर शासनाने निर्बंध घातले त्यामुळे इच्छा असूनही मनासारखे शुभकार्य करता येत नव्हते. त्यात अटकोरे शासकीय नोकरी केलेले असल्याने त्यांना काहीच अडचण नव्हती.

डॉक्टर असलेल्या ऋतुजाचे लग्न औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मधील गणपतराव सालवे यांच्या पायलट असलेल्या आकाशकुमार शी ठरले होते. त्यांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा करायचे ठरविले व त्यांना सालवे कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले.या दोघांनीही आपापल्या गावी विवाह सोहळा करायचा नाही असा ठाम निश्चय केला त्याचे कारण होते सोहळ्यासाठी होणारी न आवरता येणारी गर्दी. त्यांनी कर्जतला लग्न सोहळा करण्याचे निश्चित केले. खरे तर अटकोरेंनी आपल्या सेवा काळात अनेक मित्र मिळविले होते. त्यांना तर बोलवावे लागेल काय करावे? हे त्यांना सुचत नव्हते. अखेर कुणालाच निमंत्रित करायचे नाही असे ठरवले.

लग्नाचा दिवस उजाडला. राज कॉटेज मध्ये एका छोट्या सभागृहात लग्न सोहळा सुरू झाला. विवाह सोहळ्यासाठी 25 जणांच्या उपस्थितील परवानगी होती तरीही यावेळी वधू – वर यांच्यासह दोन्ही कुटुंबातील मिळून केवळ अकरा माणसे उपस्थित होती. दोन फोटोग्राफर, दोन बौद्धचार्य, एक ब्राम्हण, दोन जेवण वाढणारे असे एकूण अठरा जण उपस्थित होते. विवाह बौद्ध धर्म व हिंदू धर्म आशा दोन पद्धतीने पार पडला. हिंदू धर्म पद्धतीने विवाह करताना वधू – वरांच्या मागे मामा उभे असतात. त्यांची कमतरता मंडप तयार करणाऱ्या दोघांना बोलवून ती उणीव भरुन काढली व विवाह सोहळा केवळ अकरा जणांमध्ये संपन्न झाला. हा आदर्श सर्वानी डोळ्यासमोर ठेवला तर कोरोनाचे संकट नक्कीच दूर होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.