पहा श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी जागवलेल्या आर डी घरत यांच्या आठवणी
वाचा पनवेल तालुक्यातील अभ्यासु व पुरोगामी चळवळीतील पत्रकार योगेश मुकादम यांचा हा विषेश लेख !
“आर. डी. घरत नावाची अभ्यासू तोफ”
जीवन-मृत्यूच्या सुरू असलेल्या खेळात मृत्यू कायम जिंकत आहे…
जगणार किती आणि मृत्यू कधी येणार हे काेणास ठाऊक आहे…
आपल्या सभोवताली सध्या सुरू असलेल्या मृत्यू तांडवात वरील ओळी तंतोतंत लागू पडतात. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे अतिशय जवळचे हितचिंतक आर. डी. घरत यांचे निधन झाल्याचे वृत्त काल रात्री १२.३० वाजता माझ्यासमोर धडकले तेव्हा काही काळ यावर विश्वासच बसत नव्हता. दुपारपर्यंत व्हॉट्स ॲप ग्रुपवर विविध विषयांवर आपले परखड मत मांडणारी व्यक्ती रात्री अचानक जग सोडून जाते, हे पाहता मृत्यू कधी, केव्हा, कुठून येईल हे कुणीच सांगू शकत नाही, याची जाणीव पुन्हा झाली.
गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असा राजकीय आलेख उंचावणारे आर. डी. घरत हे सध्या शेतकरी कामगार पक्षाचे महानगरपालिका जिल्हा सहचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. अनेकदा आर. डी. घरत हे खुशाली विचारण्यासाठी मला फोन करायचे. माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी मला केलेला फोन आमच्यामधील शेवटचा संवाद ठरला. पण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आम्ही नेहमीच संपर्कात असायचो.
नैना प्रकल्प, नद्यांचे प्रदूषण, गाढी नदीमुळे पनवेल शहर आणि लगतच्या गावांना असलेला पुराचा धोका, स्थानिक भूमिपूत्रांवरील अन्याय हे आर. डी. घरत यांचे आवडीचे विषय. खूपदा या विषयावर त्यांच्याशी भरभरुन चर्चा करता आली. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांचा रायगड जिल्ह्यामधील जडणघडणीचा इतिहास या संदर्भात खूप माहिती घरत यांच्याकडून मिळाली.
राज्य, देशपातळीवरील प्रत्येक घडामोडींकडे त्यांचा बारीक लक्ष असे. विरोधकांना धारेवर धरणारे स्पष्टवक्ते असलेले घरत हे स्वपक्षातील नेत्यांच्या चुकांवरही बोट ठेवायला मागेपुढे पाहत नसत. तरुण पणापासून चळवळीकडे वळलेले आर. डी. घरत यांनी शून्यातून आपले राजकीय विश्व निर्माण केले. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
शेकापची अनेक आंदोलने घरत यांनी गाजवली. त्यांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाने एक लढवय्या नेता गमावला आहे. पक्षाची कधीही न भरून येणारी मोठी हानी झाली आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हे आभाळा एवढे दुःख पचवण्याची शक्ती घरत यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या चरणी प्रार्थना…
शेतकरी कामगार पक्षाची अभ्यासू तोफ
आर. डी. घरत यांना अखेरचा लाल सलाम…
…………………………………………………
- योगेश मुकादम (पत्रकार)







Be First to Comment