पनवेल,रायगड जिल्हातील रुग्णांना नवी मुंबईतील हाॅस्पिटलमध्ये सेवा मिळण्याची मागणी
सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील ।
कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्राभर भीषण स्वरूप धारण केले आहे. ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड यासाठी रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक हवालदिल होत आहेत.रायगड जिल्ह्यातील परिस्थिती याहून वेगळी नसून पनवेल महापालिका हद्दीतील व उरण, कर्जत, खालापूर येथील सर्व हॉस्पिटलमध्ये मध्ये बेड उपलब्ध होत नाहीत.यावर आशेचा किरण म्हणून जवळच असलेल्या नवी मुंबई येथील हाँस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी सहकार्य करावे अशी विनंती शिवसेनेचे पनवेल उपमहानगर समन्वयक.आत्माराम गावंड यांनी केली आहे.
नवी मुंबईच्या कुठल्याही हाँस्पिटलमध्ये , नवी मुंबई व्यतिरिक्त बाहेरील रूग्णांना दाखल करून घेण्यात येत नाहीत. याबाबत चौकशी केली असता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व हाँस्पिटलमध्ये फक्त नवी मुंबईतील रूग्णांनाच वैद्यकीय सेवा पुरवण्याचे निर्णय घेतल्याचे समजते.ही बाब अत्यंत धक्कादायक असुन, वैद्यकीय सेवा मिळवण्याच्या अधिकाराचा गैरवापर होतांना दिसत आहे. मुंबई महानगरपालिके तर्फे चालवणाऱ्या जे.जे., के.ई.एम., लोकमान्य टिळक रूग्णालय आदी व इतर अनेक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत.इथे दररोज हजारो रूग्णांवर उपचार केले जातात.त्यात किरकोळ आणि मोठा आजार झालेल्या रूग्णांचा समावेश असतो.मोठया आणि अवघड स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधा या हाँस्पिटलमध्ये आहेत. त्यात उपचार करण्यासाठी नाममात्र खर्च येतो.त्यामुळे ही हाँस्पिटल सर्व सामान्यांना आधार देणारी आहेत.
नवी मुंबईसह पनवेल,उरण, कर्जत, खालापूरसह राज्यातील रूग्ण मुंबई कडे धाव घेतात. मुबई पालिकेने कधीही दुजाभाव केला नाही. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील इंडिया बुल स्थित सुमारे एक हजार बेड असलेले हाँस्पिटल सुरू आहे.तसेच कामोठे एम.जी.एम. मध्ये हि मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील रूग्णांना प्रवेश दिला जातो. तेव्हा कुठलाही भेदभाव केला जात नाही.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोर्बे धरण ( चौक ) व हेटवणे धरण ( पेण ) ही दोन्ही धरणे रायगड जिल्ह्यात आहेत.रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांनी सामाजिक हित व नवी मुंबईच्या विकासाचा विचार करताना आपल्या उपजीविकेचे साधन दिले आहे याची थोडी तरी जाणीव ठेवताना कोरोना महामारीने पनवेल रायगडमध्ये घातलेल्या थैमानचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी पनवेल,उरण तालुक्यातील रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देणे बाबत विचार करावा अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आयुक्त नवी मुंबईचे आयुक्त बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष भेटून करण्यात येणारलअसे आत्माराम गावंड यांनी सांगितले.








Be First to Comment