सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू ।
राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली तरी राज्य सरकारने काही घटकांना मदतीचा हात पुढे केला. या घटकांपैकी रिक्षाचालकांना दीड हजाराचे अर्थसहाय्य दिले जाईल, असेही सरकारने जाहीर केले होते. मात्र, अद्याप मदतीची रक्कम रिक्षाचालकांना मिळाली नसून हे पैसे मिळणार कधी, याकडे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.
रिक्षा रस्त्यावर धावत असल्या तरी सध्या प्रवासीच नाहीत. त्यामुळे भाड्यासाठी रिक्षाचालकांना बराच वेळ एका ठिकाणी उभे रहावे लागत आहे. मदतीची रक्कम देण्याविषयी सरकारी पातळीवर अद्याप काहीच हालचाली नाहीत. त्यात व्यवसायही होत नसल्याने रिक्षाचालकांची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे.
मागील वर्षभरापासून करोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये रिक्षाव्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता येत गेल्यानंतर रस्त्यावर रिक्षा धावू लागल्या. मात्र, ’वर्क फॉर्म होम’ तसेच करोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने प्रवासी मिळेनासे झाले. त्यात बरेच दिवस सर्वसामान्यांसाठी लोकलसेवादेखील बंद असल्याने याचाही फटका रिक्षाचालकांना बसला होता. त्यामुळे दररोजच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याने घरखर्च तसेच बँकेचा हप्ता भागवणे रिक्षाचालकांना अवघड झाले.
करोना साथीला वर्ष झाले असून अद्यापही रिक्षाव्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेला नाही. त्यामुळे रिक्षाचालक चिंतेत असताना करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली. संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यास सरकारने मुभा दिली आहे. शहरात रिक्षा धावत असल्या तरी प्रवाशांची संख्या कमी आहे.
भाड्यासाठी पुन्हा एकदा रिक्षाचालकांना तासंतास प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धंदाच होत नसल्याने रिक्षाचालक चिंताग्रस्त आहेत. परंतु सरकारने कडक निर्बंध लावत असताना रिक्षाचालकांना दीड हजारांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत रिक्षाचालकांना दिलासा दिला. ही रक्कम तुटपुंजी असली तरी हे पैसे मिळणार कधी ? असा प्रश्न रिक्षाचालक उपस्थित करू लागले आहेत.
Be First to Comment