महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेकडे मागणी
सिटी बेल । कामोठे ।
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये कामोठे विभागात पॉझिटिव पेशंट आढळून येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचा गांभीर्याने विचार करत कामोठे महा विकास आघाडीने,कामोठे वासीयांसाठी महानगरपालिकेकडे डेडिकेटेड कोव्हिड सेंटर उभारण्याची मागणी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक शंकर म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस चे सूरदास गोवारी, शिवसेनेचे राकेश गोवारी आणि भारतीय काँग्रेस पक्षाचे रघुनाथ पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आले. या पत्रामध्ये कामोठे शहरातील नागरिकांसाठी अन्य मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.
डेडिकेटेड कोव्हिड सेंटर उभारण्या बरोबरच कामोठे येथे लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज असल्याचे सदर पत्रामध्ये नमूद केले आहे. तूर्तास कामोठे येथे एक लसीकरण केंद्र असून या लसीकरण केंद्रामध्ये बऱ्याच वेळेस लस उपलब्ध नसतात. त्यामुळे लसींच्या पूर्ण साठ्या सह कामोठे जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि नौपाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लसीकरण केंद्रे उभारावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बराच वेळ उभे राहावे लागते. कित्येक वेळा रांगेत उभे राहिल्यानंतर लसी उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात येते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस घेऊन झालेला असल्याकारणामुळे उर्वरित डोस त्यांना घरोघरी जाऊन देण्यात यावा अशी मागणी महाविकासआघाडी ने केली आहे.
कामोठे शहरातील कित्येक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात. या सर्व इस्पितळांचे महापालिकेच्या तज्ञ कमिटीकडून सेफ्टी ऑडिट करण्यात यावे तसेच कामोठे शहरातील कोरोना पेशंट वर ट्रीटमेंट करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कामोठे मधील स्थानिक नागरिकांसाठी बेड राखीव ठेवण्यात यावेत अशी मागणी देखील या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
या पत्रामध्ये सोशल डिस्टंसिंग राखण्याच्या दृष्टीने भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी ही अत्यंत गंभीर असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर उपाय म्हणून भाजी मंडई मधील भाजी विक्री बंद करून कामोठे शहरातील चौकाचौकात भाजीविक्री करण्यास अनुमती द्यावी असे महाविकासआघाडी मधील नेत्यांचे म्हणणे आहे.
कामोठे महा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या तमाम मागण्या रास्त असून त्या मंजूर झाल्यास कामोठे वसाहतीमधील नागरिकांना निश्चित दिलासा मिळेल. सदर पत्राची एक प्रत पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांना पाठविण्यात आली असून अन्य प्रति जिल्हाधिकारी निधी चौधरी व आमदार बाळाराम पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत.







Be First to Comment