सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
कोकणवासीयांनि शिमगा,होळीचा सण साजरा केलेला आज दीड महिना होऊन गेला.मात्र या सणानंतर प्रचंड उष्मां जाणवू लागला आहे.तर अधिकाधिक वाढत असलेल्या दाहकतेमुळे उन्हाचे चांगलेच चटके लागत आहेत.तापमानाचा पारा वाढतच असल्यामुळे ग्रामीण भागात व शहरातही उन्हाळ्यातील जिन्नस तयारिकडे महिलावर्गाची लगबग मात्र जोरातच सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
उन्हाळ्यात अनेक पदार्थ बनविले जातात.वर्षभर सुस्थितीत रहावे यासाठी वाळवण सूद्धा करण्यात येत असल्याने कडाक्याच्या उन्हात पुरेल असे आवश्यक जिन्नस बनविण्याची महिला वर्गाची सकाळ पासूनच धावपळ सुरू होते.शेतातील कामे उरकली आहेत.त्यातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रखरखत्या उन्हात महिला वर्ग मात्र घरीच असल्याने पापड, मिरगुंड्या,फेण्या,कुरडया,शेवया,सांडगे,वड्या यांसह इतर वस्तू बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
यांसह कांदा,गहू,तांदूळ,ज्वारी, बाजरी, डाळी,सुकी मिरची तर सुकी मासळी यांचे सुद्धा वाळवण घेतले जात आहे.शहरी भाग असो वा ग्रामीण भाग असो धार्मिक बाबी या सर्वांना सारख्याच असतात.सणवार,उत्सव,यात्रा या बाबी शेतकरी आणि शेती विशेषतः ग्रामीण भागाशी जोडलेल्या असतात.
त्यानिमित्ताने घरात वापरातील सर्व जिन्नस बनवून साठवून ठेवले जातात.घरातील महिलांसह, मुली तर काही ठिकाणी चिमुरडी मुले आपल्या घरातील आईसह शेजाऱ्यांना आवडीने याकामी मदत करतात.
दिवसेंदिवस बदल होत असला तरी पदार्थ,जागा आणि वेळेअभावी काहीना करता येत नसले तरी दुकानातून विक्रीला उपलब्ध असेल तरी सहज मिळतात.या जिन्नस बनविण्यातून अनेक महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळविला आहे तर काही महिला याच जिन्नसावर आपल्या घराचे उदरनिर्वाह चालवितात. मात्र सध्या कोरोनाच्या महामारीत कोणीही बाहेर पडत किंवा फिरकत नसले तरी ग्रामीण भागात घरातील मंडळी आपआपल्या परीने आंगणात तर शहरी भागात विविध सोसायट्या मधून उन्हाळ्यातील जिन्नस बनविण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दिसते.








Be First to Comment