रोह्यात लसीकरणाची जनजागृती होणे गरजेचे
सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
कोविड १९ च्या महामारीला रोखण्यासाठी रोहा तालुक्यात १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे.त्यासाठी रोहा नगरपालिका क्षेत्रात नगराध्यक्ष, नगरसेवक तर ग्रामीण क्षेत्रात सरपंच,सदस्य पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक वर्गातून केली जात आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तर काही ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या घटना घडत आहेत.दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे या भयावह परिस्थितीत प्रशासनही हादरले आहे.रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने वैद्यकीय सोयी सुविधांचा अभाव होताना दिसत आहे त्यामुळे बेड, रेमडेसिवर इंजेक्शन, ऑक्सिजन,या साऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.त्यातच आहेत त्याच रुग्णवाहिकांवर अतिरिक्त ताण आल्याने रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने,रुग्णाच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त भुर्दंड सहन करून खाजगी वाहनाने रुग्णांची ने - आण करावी लागा आहे.
एकंदरीत रायगड मधे काल ४२ रुग्ण मयत असल्याचे समोर आल्यानंतर रोहा तालुक्यात कोरोनाने घातलेले थैमान थांबविण्यासाठी १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. नगर पालिकेत प्रभागवर ३ ते ४ नगरसेवक आहेत.प्रभागात १०० टक्के लसीकरण करण्याची जबाबदारी नगरसेवकांवर द्यायला हवी.आपल्या प्रभागातील मतदारांचे आरोग्य सुरक्षित राखणे ही या नगरसेवकांची असल्याने जिल्हा प्रशासनाने शहारातील व ग्रामीण भागातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांवर त्या त्या विभागातील ग्रामस्थांच्या लसीकरणाची जबाबदारी सोपवायला हवी.
लसीकरण झाल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि भीतीचे वातावरण कमी होऊन काही प्रमाणात कोरोना वाढीच्या चैनला थांबा मिळेल.रोह्यात रोहाउपजिल्हा रुग्णालय, चणेरा, आंबेवाडी आणि नागोठणे असे एकूण चार ठिकाणी लसीकरण केंद्र असून या ठिकाणी अजूनही हवे तेवढे लसीकरण झालेले नाही,कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहणे तितकेच महत्वाचे असून लसिकरणाबाबत जनजागृती करणे अधिकाधिक महत्वाचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.








Be First to Comment