स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीने विम्याच्या रकमेचा दावा शुल्लक कारणावरून नाकारला
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
गेली चार वर्षे ग्राहक असलेल्या व्यक्तीला कोविड सारख्या आजारपणात आरोग्य विम्याची रक्कम देण्याची वेळ येताच नको ती क्षुल्लक कारणे देत आरोग्य विम्याचा दावा नाकारण्याचा धक्कादायक प्रकार स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीने केला आहे. त्यामुळे नागोठण्यातील त्यांचे एक ग्राहक चेतन दिलीप टक्के यांना एक लाखाच्या वर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी या आरोग्य विमा कंपन्या उपयोगी पडत नसल्याने यांचा काय उपयोग असा सवाल उपस्थित करीत या आरोग्य विमा कंपनीवर न्यायालयात दावा ठोकणार असल्याचे चेतन टक्के यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार नागोठण्यातील चेतन दिलीप टके यांनी जून, २०१६ मध्ये प्रथमच आपली पत्नी व मुलगा अशी तिघांची एकत्रित आरोग्य विमा पॉलिसी स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या पनवेल शाखेकडून खरेदी केली होती. त्यासाठी आवश्यक ते शुल्कही त्यांच्याकडून भरण्यात आले. त्यानंतर दरवर्षी त्यांनी या पॉलिसीचे नुतनीकरण त्या त्या वेळचे आवश्यक ते शुल्क भरून केले.
गेल्यावर्षी २६ जुलै, २०२० रोजी या पॉलिसीची मुदत संपत असल्याने पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेचा धनादेश चेतन टक्के यांनी विमा कंपनीस दिला होता. मात्र खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असतांनाही व ज्या नवीन सहीने तो धनादेश दिला होता त्या नवीन सहीची पूर्तता धनादेश देण्याच्या १३ दिवसांपूर्वीच बँकेत केले असल्याचे टक्के यांनी स्पष्ट केले असतांनाच केवळ सही जुळत नाही असे कारण देत हा धनादेश न वटल्याने पॉलिसीचे नुतनीकरण विमा कंपनीकडून करण्यात आले नाही. याची कल्पना जेव्हा चेतन टक्के यांना मिळाली तेव्हा त्यांनी विमा कंपनीचा संबधित विमा प्रतिनिधी मुर्तगंध पाटील यांच्याशी संपर्क साधून रोख पैसे भरून सदर पॉलिसीचे नुतनीकरण ८ ऑगस्ट, २०२० रोजी करून घेतले. त्यानंतर ८ ऑगस्टला दुपारी करण्यात आलेल्या चेतन टक्के यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल ९ ऑगस्ट रोजी मिळाला. व तो पॉझीटीव्ह आल्याने त्यांना नवी मुंबई येथील एम.पी.सी.टी. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यानंतर टक्के यांना १७ ऑगस्टला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले. या कालावधीत झालेल्या वैद्यकीय उपचार खर्चाची रक्कम मिळण्यासाठी हॉस्पिटलची बिले व आवश्यक ती कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. मात्र तुम्ही पॉलिसी काढायच्या आधीपासूनच आजारी होतात अशा प्रकारची कारणे देत कंपनीने खर्चाची रक्कम देण्यास नकार दिला.
अशाप्रकारे केवळ पॉलिसी काढतांना ग्राहकांशी गोड बोलण्याचे काम या विमा कंपन्यांचे प्रतिनिधी करतात नंतर पैसे देण्याची वेळ आली की, नको ती क्षुल्लक कारणे देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ करतात हे प्रकार म्हणजे ग्राहकांची निव्वळ फसवणूक आहे. तसेच पॉलिसी काढूनही चार-पाच महिने या कंपनीची पॉलिसी मिळत नसल्याचे प्रकार माझ्यासह उरण येथील आमच्या अनेक नातेवाईकांच्या बाबतीत घडले असल्याचे चेतन टक्के यांनी सांगितले. तसेच मी जर आधीच आजारी होतो असे कारण विमा कंपनी जर आता पैसे देण्याच्या वेळेस पुढे करत असेल तर मग पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळेस माझी वैद्यकीय वा कोरोना तपासणी का करण्यात आली नाही ? आणि मी आधीच कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा विमा कंपनीकडे तरी काय पुरावा आहे असा प्रश्नही टक्के यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान कोविड बाबतीत रुग्णांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे शासनाचे सक्त निर्देश असतांनाही खासगी विमा कंपन्या ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. ग्राहकांच्याच पैशांतून लाखो रुपयांच्या जाहिराती दूर चित्रवाणीच्या वाहिन्यांवर देऊन ग्राहकांना आरोग्य विमा पॉलिसी काढण्यासाठी आकर्षित करतांनाच त्याच ग्राहकांना त्यांच्या आजारपणाच्यावेळी काहीना काही क्षुल्लक कारण काढून विमा रक्कम नाकारणाऱ्या या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात सरकारच्या आरोग्य खात्याकडे दाद मागण्याबरोबरच न्यायालयातही दावा दाखल करणार असल्याचे चेतन टक्के यांनी सांगितले.
यासंदर्भात स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या पनवेल शाखेचे व्यवस्थापक मेहबूब शेख यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने मंगळवारी(दि.२०) संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याप्रकरणी आमच्या विमा प्रतिनिधीकडून मला कल्पना मिळाली नसल्याने तुम्ही मला क्लेम इंटिमेशन नंबर द्या नंतर त्यानुसार मी याप्रकरणी नक्की काय घडले याची माहिती देईन. मात्र नंतर शेख यांना क्लेम नंबर देऊनही त्यांनी स्वतःहून तर प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क केला नाहीच. उलट प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असताही संपर्क होऊ शकला नाही.








Be First to Comment