पनवेलरांशी जुळलेले ऋणानुबंध सेवानिवृत्तीनंतरही जपले : मोठ्या रूग्णालयात न जाता पत्नी आणि त्यांनी घेतले पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात घेतले कोरोनावर उपचार
माजी पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला केली एक लाख रुपयांची भरीव मदत
सिटी बेल । पनवेल ।
खाकी वर्दीतला देव कसा असतो याची प्रचीती माजी पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पनवेवकरांना दिली. पोलीस उपआयुक्त पदावरून निवृत्त होऊन देखील जेव्हा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांनी कोणत्याही मोठ्या रूग्णालयात दाखल न होता पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवून येथे उपचार घेतले. खरंतर त्यांना कोणत्याही मोठ्या रूग्णालयात सहज दाखल होता आले असते. परंतु त्यांनी तसे न करता सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवला. त्याचबरोबर येथुन बरे होऊन जाताना आपली सामाजिक बांधिलकी जपत उपजिल्हा रुग्णालयाला तब्बल एक लाखांची भरीव मदत देखील दिली.
कोण आहेत हे शेषराव सूर्यवंशी ?
मार्च १९८३ मध्ये शेषराव सूर्यवंशी सब इन्स्पेक्टर म्हणून राज्य पोलिस सेवेत रुजू झाले आणि वेगवेगळ्या क्षमतेखाली समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या सेवा कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी तैनात होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक (२०१०), डीजीपी इनसिगनिया (२००७), अखिल भारतीय पोलिस शुल्क मेळावा (२००६) मधील रौप्य पदक आणि महाराष्ट्र पोलिस मेळाव्यात (२००५) १ सुवर्ण व २ रौप्य पदके प्रदान करण्यात आले आहेत. या बरोबरच त्यांना चांगले अन्वेषण, शोध, कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या हाताळण्यासाठी इतर ७८३ सुयोग्य पुरस्कार आणि “चांगले तपास अधिकारी” म्हणून डीजीपी महाराष्ट्र कडून विशेष सन्मान मिळाला आहे.

अशा प्रकारे सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल,नवी मुंबई व नंतर पोलीस उपायुक्त, सीआयडी, पुणे येथे ३६ वर्षांच्या महाराष्ट्र पोलिसांच्या अविरत आणि समर्पित सेवेनंतर जून २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. असे असताना देखील तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल नवी मुंबई असताना त्यांचे पनवेल करांचे जुळलेले नाते हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील तितकेच महत्वाचे वरदान ठरले आहे, गेल्या पंधरा दिवसापूर्वी सूर्यवंशी हे स्वतः व त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले व हा आज रोजी हे दांपत्य बरे होऊन पुणे येथे आपल्या घरी गेले.
या संपूर्ण काळात त्यांना जेवणाचा डबा हा पनवेलकरांकडून कडून येत होता, इतके मोठे अधिकारी असताना देखील ते कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता त्यांचे पनवेलरांशी जुळलेले ऋणानुबंध जपत त्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घेण्याचे ठरवले आणि जाताना त्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात एक लाख रुपयाची भरीव मदत पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला देत खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पोचपावती पनवेलकरांना त्यांनी दिलेली आहे.










Be First to Comment