Press "Enter" to skip to content

खोपोलीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय

 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांचे अवाहन

सिटी बेल । खोपोली । संतोषी म्हात्रे ।

खोपोली शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय शुक्रवारी पालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला व्यापारी संघटना, सामाजिक संस्थेच्या प्रमुखांसह लोक प्रतीनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. शनिवार ते सोमवार अशा तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूत औषधांची दुकाने वगळता सर्व आस्थापने बंद ठेवली जाणार आहेत.तर कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी या निमित्ताने केले आहे.

खोपोली पालिकेत झालेल्या बैठकीला नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनीता कांबळे, गटनेते सुनील पाटील, मंगेश दळवी, नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, नगरसेविका माधवी रिठे, आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, सेनेचे नवीनचंद्र घाटवळ, भाजपचे इंदरमल खंडेलवाल, ईश्वर शिंपी, कांतीलाल पोरवाल, संतोष जंगम, अँड. राजेंद्र येरुणकर,राजेंद्र फक्के,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पिंगळे, शिळफाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश आभाणी,सुभाष पोरवाल, तात्या रिठे,अशोक ठकेकर,यांच्यासह व्यापारी संघटना, भाजी विक्रेते, राजकीय पक्षाच्या प्रमुखांसह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

           कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ते ३० एप्रिल दरम्यान राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी असतानाही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने संसर्गाची साखळी कशी तुटणार असा प्रश्न उपस्थित होत होता. खोपोली शहरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून मृत्युचे प्रमाणही अधिक वाढले आहे.कोरोना बाधित कुटूंबातील सदस्यही बाजारात मुक्तपणे फिरत आहेत त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढले आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय शुक्रवारी पालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. शनिवारी सकाळपासून सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा तीन दिवसीय जनता कर्फ्यू असणार आहे.

        जनता कर्फ्यू दरम्यान पालिका क्षेत्रातील औषधांची दुकानं वगळता सर्व आस्थापने स्वयमस्फूर्तीने बंद ठेवली जाणार आहेत. सकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत दूध विक्रीला मात्र जनता कर्फ्यूमध्ये परवानगी देण्यात आली आहे. सकाळी १० वाजल्यानंतर दुधाची दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत. शहरातील नागरिक, भाजी, फळ विक्रेते, रिक्षा चालक, मच्छी आणि मटण विक्रेते, किराणा दुकानदार यांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी या निमित्ताने केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.