Press "Enter" to skip to content

ऐनघर विभागातील स्थानिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

कोरोना, वाढत्या महागाईने जनता झाले त्रस्त : स्थानिक पुढाऱ्यांबद्दल तीव्र आक्रोश

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

रायगड जिल्ह्यात मागील वर्षांपासुन सुरु असलेला कोरोनाचा कहर व आता सद्यपरिस्थितीत सुरु असलेली कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे जनता हैराण झाली आहे. रोहा तालुक्यातील ऐनघर विभागात देखील अनेक कारखाने असूनही बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

ऐनघर विभागातील सुकेळी हद्दीत पाच ते सहा पोलादी पाईपचे उत्पादन करणारे जिंदाल समुहाचे कारखाने सुरु असुनही सर्वसामाण्य जनतेला येथे रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी विभागातील तरुण मंडळी शहराचा आधार घेतांना दिसत आहेत. त्यामुळे या विभागातील बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र दिसून येत आहे.

रोहा तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक वर्षांपासुन ब-याच कंपन्या सुरु असुन यामध्ये महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड, विभोर स्टील, हायड्रील जिंदाल, जिदांल साॅ, रायगड प्लास्टिक अशा अनेक कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या विभागामध्ये २० ते २५ वर्षांपासुन या कंपन्या सुरु आहेत. पंरतु या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने काही स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरुन ऐनघर विभागातील स्थानिकांना आजपर्यंत रोजगारापासुन वंचित ठेवले आहे.

ऐनघर विभागामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. यामध्ये डिप्लोमा, इंजिनियर, आय. टी. आय तसेच पदवीधर तरुण घरीच बसुन आहेत. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न समोर ऊभा राहीला आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध असलेला शेती हा एकमेव जोडधंदा राहीला आहे. पंरतु वातावरणातील बदलामुळे व न परवडणा-या मोलमजुरी व महागाईमुळे शेती करणे देखील कठीण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन फक्त निवडणुका आल्या की, नुसतीच जनतेला आश्वासनांची खैरात करायची. मात्र एकदा का निवडणुका झाल्या की याच जनतेकडे पाठ फिरवायची अशी परिस्थिती येथे आहे. म्हणूनच तर
येथील ग्रामपंचायत मध्ये निवडून येणारे स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यात धन्यता मानत असल्याची ओरड नेहमीच तरुण वर्गातून होत आहे.

रोजगार उपलब्ध करुन देण्याची नुसतीच आश्वासने देऊन या विभागातील तरुणांच्या व जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम येथील स्थानिक पुढाऱ्यांकडून गेली अनेक वर्षे सुरु असल्याने त्यांच्याबद्दल जनतेतून तीव्र संतापही व्यक्त होत आहे.

त्यामुळे या विभागातील सर्वसामान्य जनतेला, बेरोजगारांना कोणी वाली तयार होईल का ? व ऐनघर विभागातील हा महत्वाचा बेरोजगारीचा प्रश्न कोणी सोडवेल का ? याकडे या विभागातील जनता आस लावुन बसली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.