सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. उरणमध्ये ही कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता उरणच्या जनतेने स्वतःची काळजी व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला सहन करावे लागतील.
एखादया व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यांनी तपासणी केल्यानंतर रिपोर्ट येण्यास दोन तीन दिवसांचा अवधी लागतो. तो पर्यंत सदर व्यक्ती इतर ठिकाणी वावरत असल्याने संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ज्यांना कोरोनाचा संसर्ग जाणवेल त्यांनी तपासणी केल्यानंतर जो पर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत इतर ठिकाणी फिरण्यासाठी प्रशासनाने बंदी घालावी अन्यथा रिपोर्ट त्वरित देण्याची सोय करण्यात यावी. यामुळे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे वाटते.
आजच्या रिपोर्टमध्ये ३७ पॉजेटीव्ह, ९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले तर ३ जण मयत झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शनिवार – रविवार टाळेबंदी करून पाहिली तरीही लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत, गर्दी टाळत नाहीत तसेच अनावश्यक फिरत आहेत. परिणामी करोना वेगाने आपले हातपाय पसरत चालला आहे.
कोरोना विषाणूचा जोर वाढत असून, दुसऱ्या लाटेमध्ये आकडेवारी खूपच वाढू लागली आहे. उरण तालुक्यामध्येही या विषाणूची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. दररोज बाधितांची संख्या मोठ्या आकड्यांनी वाढत आहे. आज पुन्हा ३७ नवे रुग्ण आढळले तर ३ जण मयत झाले आहेत. यामुळे आपण सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आवश्यक असेल तरच बाहेर पडा. घरातील लहान मुले आणि वयोवृद्धांना सांभाळा. कुटुंबातील व्याधीग्रस्त सदस्यांची जास्त काळजी घ्या. सॅनिटायझर आणि मास्कचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
शासन आपल्या आरोग्याबाबत काळजी घेत आहेच. मात्र आपण आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काळजी घेणे महत्वाचं आहे. खासगी रुग्णालयामध्ये या आजारावर लाखो रुपये खर्च येतात, ज्यांच्याकडे पैसे भरण्याची ताकद आहे ते भरतातही. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना जीवाला मुकावे लागत आहे हे लक्षात घ्या. आपल्या घरातील प्रत्येक सदस्य आपल्यासाठी बहुमूल्य आहे याचा विसर पडू नये.
उरण परिसरात कोरोना पॉजेटीव्हचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखत असेल अथवा वास येत नसेल आणि चव लागत नसेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन कोविडची तपासणी करून घ्यावी. कोव्हीड-19 चाचणी केल्यानंतर जोपर्यंत निगेटिव्ह अथवा पॉजेटीव्हचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत विलगीकरणात राहावे अथवा बाहेर फिरूनये. मात्र अनेकजण तपासणी केल्यानंतर रिपोर्ट दोन तीन दिवसांनी आल्यानंतर काहीजण पॉजेटीव्ह आले आहेत. परंतु या दरम्यान ते अन्य ठिकाणी बिनधास्त फिरत असतात. त्याचा प्रादुर्भाव इतरांना झाल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी कोविडची तपासणी केल्यानंतर रिपोर्ट येइपर्यंत त्यांना अन्य ठिकाणी फिरण्यास बंदी घालावी अथवा रिपोर्ट त्वरित देण्याची प्रक्रिया शासनाने सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे अवघड बनेल.
आजच्या घडीला कोरोनाची लागण कोणालाही होऊ शकते. म्हणूनच आपल्या शेजारी पाजारी राहणारे, कुटुंबातील नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक यापैकी कोणास कोरना झाला असेल त्यांना विलीगकरणात ठेवले असेल तर यातून जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत जी काही मदत लागेल ती त्यांना करावी. यामुळे कोरोना व्यक्ती व त्याचे कुटूंब लवकर बरे होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. तसेच उद्या आपल्याला बाधा झाली तर हीच माणसं माणुसकीच्या भावनेतून नक्कीच मदत करतील. आपण एकमेकांच्या अधिक जवळ येऊन एकमेकांना मदतीचा हातभार देऊ शकतो.
शासन आपले जीवनमान सुरक्षित रहावे यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु त्यासाठी शासनाने जी नियमावली दिली आहे. त्याचे पालन करणे आपल्यासह आपल्या कुटूंब व मित्र परिवार, हितचिंतक यांच्यासाठीही महत्वाचे असणार आहे. या सर्वांना प्रतिसाद देऊन कोरोना हद्दपार करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे.








Be First to Comment