तिची कथा
ऐक ना!!
या प्रश्नावर तुझे नेहमीचे
आत्ता वेळ नाही
हेच ऐकायची सवय झाली होती
मिटून घ्यायचे मी मनाच्या पाकळ्या
माझ्या जीभेवर रेंगाळलेले शब्द
राहायचे तिथेच महिनोनमहिने
सध्या तुला भरपूर वेळ आहे
सुरुवातीला चडफडलास
आभासी दुनियेत दोन चार दिवस
मनसोक्त हुंदडलास
वर्क फ्रॉम होम म्हणून
रुममध्येच अटेंड केल्यास
अगणित बिझनेस मिटिंग्स
तरीही बराच रिकामा वेळ होता उरलेला
तुझ्या डायरीतल्या लाल खुणा
एक दिवशी बंदच झाल्या
मग मात्र तुला अचानक जाणवले
चोवीस तासाचा दिवस किती
लांबलचक असतो ते…
तू हळूच डोकावलास दोन्ही
पिल्लांच्या खोलीत
दोघांनाही सवय झाली आहे
आपापला जीव रमवायची
तुझ्याशी संवाद केव्हाच तुटला होता..
त्यांच्यालेखी तुझी ए टि म एवढीच
किंमत उरली होती..
तुझ्या प्रेम व्यक्त करण्याला सतत
प्राईझ टॅग जोडलेला असायचा
एखाद्या किमती गिफ्टचा..
माझ्याही मागे मागे घोटाळलास
लग्नापूर्वी जसा असायचास आसपास
अगदी तसाच …
माझीही सवय मोडलीच होती
तू असा आसपास असण्याची
चक्क लुडबूड वाटली तुझी..
मी कधी वर्क फ्रॉम होम केलेच नाही
मी कायमच वर्क फॉर होम केलय ना..
त्यावरही तू अतिक्रमण करशील
अशी भितीही वाटली कुठेतरी
मनाच्या एका कोपऱ्यात
की तुला येऊच द्यायचे नव्हते
मला माझ्या परिघाच्या आत
जाणवतेय रे तुझी धडपड
गेलेला तडा सांधण्याचे तुझे प्रयत्न
वाटतय द्यावा तुला प्रवेश
निदान माझ्या परिघात तरी
एक सांगू
भिती वाटतेय
लवकरच पुन्हा पूर्वीसारखे
तुझे बिझी रहाणे
अॉफीसशी संसार थाटणे
सारे सारे सुरू होईल
पुन्हा नव्याने मी दुखावेन
पुन्हा जातील तडे
सांधलेल्या भेगा
उघड्या पडतील
मग कशाला नसते व्याप
तू आपला तुझ्या जगात
आणि आम्ही आमच्या जगात
हेच बरे
“वसुधैव कुटुंबकम्” म्हणताना
एकाच कुटुंबाची एकाच छताखाली
दोन कुटुंबे झालीच ना रे??
करोनाने
घराघरात
किती, कशी, कुठवर
खोल पडझड झालीय
हे छान समजावून दिले
नाही का रे…
त्याची व्यथा
ए ऐक ना…
ठेव ना तुझी कामे जराशी बाजूला
माझ्याकडे बघ तरी
नेहमी म्हणायची माझ्याकडे
वेळ नसतो कधीच तुझ्यासाठी
आता मी फटाफट माझी चार दिवसांची कामे लवकर लवकर संपवून तुमच्या बरोबर क्वालिटी टाईम
स्पेंट करावा म्हणून तुमच्या आजूबाजूला घोटाळतोय तर…
तुम्ही आपापल्या जगात व्यस्त
मला जणू हद्दपार केलय मुलांनी
त्यांच्या विश्वातून…
चार ओळींचा सुद्धा झाला नाही
त्यांच्यामाझ्यातला संवाद..
घरासाठी, मुलांसाठी पैसे कमावताना
वेळ देता आलाच नाही त्यांना
यायचो मग देशपरदेशातून
महागडी गिफ्ट्स घेऊन
जणू भरपाई करायचो न दिलेल्या वेळाची…
आजकाल तूही बोलत नाहीस
टाळतेस का ग मला??
तुझ्यामाझ्यातलाही संवाद संपला??
एवढ्या मोठ्या कंपनीतले अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडवतो…
आपल्या साऱ्यांच्या नात्यातला गुंता
कसा सोडवू कळतच नाही ग
या करोनाने माझे डोळे उघडले
मॅनेजमेंट स्किल्स ना पुरते हरवले
डॉ. समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment